Wed, Jul 17, 2019 20:07होमपेज › Pune › बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात  जून 2016 मध्ये दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याच्या तपासात अनेक त्रुटी आढळल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांनी या प्रकरणाचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला आहे. 

मागसवर्गीय उच्चशिक्षित पीडित महिलेला ऑक्टोबर महिन्यात झोन-2 च्या कार्यालयात कार्यरत असलेले वाचक विलास बाबूराव जाधव याला मारहाण केल्याच्या कारणावरून अटक करून दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. जाधव यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनीच आपल्याला जबर मारहाण करून, अश्‍लील व जातिवाचक भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेने केला होता. एवढे सगळे झाल्यानंतरदेखील पोलिसांनी पीडितेला अटक करून पोलीस कोठडीत ठेवले. कोठडीची मुदत संपल्यानंतर पीडितेची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

झालेल्या मारहाणीबाबत पीडितेने त्याबाबत संबंधित वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने पीडितेने आयोगाकडे तक्रार केली. त्यावर पुण्यात सुनावणी झाल्यानंतर आयोगाने पीडितेच्या तक्रारीबाबतचा सर्व तपास सीआयडीकडे सोपविला आहे. आयोगासमोर झालेल्या सुनावणीत कोरेगाव पार्क पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी समोर आल्या. तसेच, पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने त्यांच्यासह इतर युवतींचे अश्‍लील चित्रीकरण केलेले व्हिडिओ ज्या लॅपटॉपमध्ये होते, तो लॅपटॉप पोलिसांनी बदलला.

त्याबाबतची तक्रार आयोगाकडे करण्यात आली आहे. पीडित महिला मागासवर्गीय असतानादेखील अ‍ॅट्रॉसिटीचे कलम 10 महिन्यांनंतर लावले, तर दोषारोपपत्र दाखल करताना पुरावा नष्ट केल्याबाबतचे कलम लावले. आरोपी हा मुंबईतील गर्भश्रीमंत असल्याचे पीडितने सांगितले आहे. केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे, तसेच कोरेगाव पार्क पोलिसांनी केलेल्या गुन्ह्याच्या तपासात त्रुटी आढळून आल्यामुळे आयोगाने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.