होमपेज › Pune › वेश्या व्यवसाय रोखण्यास आता ‘सीआयडी’च हवी

वेश्या व्यवसाय रोखण्यास आता ‘सीआयडी’च हवी

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 1:19AMपुणे : विजय मोरे

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून चालणार्‍या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाने चांगलीच गती घेतली आहे. जिल्ह्यातील हिल्स स्टेशन, आय.टी. कंपन्यांचा परिसर  आणि  शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल्स नजीकच्या परिसरात हा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. हजारो ग्राहक त्यांच्या जाळ्यात अलगद अडकू लागले आहेत. या धंद्याला पायबंद घालण्यासाठी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागानेच (सीआयडी)प्रामुख्याने लक्ष घालून धडक कारवाई करणेच गरजेचे आहे.

सध्या फेसबुक हे माध्यम मोठे प्रभावी ठरत चालले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात तर तब्बल पन्नास लाखांपेक्षा अधिक मोबाईल धारक आहेत. तर तेवढेच फेसबुकचा वापर करतात. या माध्यमातून तत्काळ संपर्क साधता येतोच व संवादही होत असल्याने अनेक व्यावसायिकांनी याचा चांगलाच लाभ घेतला आहे. उच्चशिक्षित तरूणाई आय.टी.क्षेत्रात मोठ्या  प्रमाणावर कार्यरत आहेत. याच तरूणाईवर लक्ष केंद्रीत करून हायप्रोफाईल वेश्या व्यवसातील एस्कॉर्ट सर्व्हिस देणार्‍या दलालांनी फेसबुक आणि व्हॉटसअपचा वापर वेश्या व्यावसायासाठी खुबीने करण्यास सुरूवात केली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात या दलालांनी पध्दतशीरपणे शिरकाव केला आहे.बांग्लादेश, काश्मीर, दिल्ली, कोलकत्ता, पंजाब, आणि पूर्वोत्तर राज्यातील सुंदर तरूणींना या धंद्यात पैशाच्या मोठ्या अमिषाने जाळ्यात ओढ्ले जात आहे. मॉडेल अर्शी खान, अय्याज झारा, या दिल्ली आणि काश्मिरमधील हायप्रोफाईल वेश्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या धंद्याची व्याप्‍ती उघड झाली होती. विशेष म्हणजे खास वेश्या व्यवसायासाठी कॉल सेंटर चालविला  जात असल्याच्या पदार्फाशही उघड करण्यात आला होता. हा धंदा उंची फ्लॅट आणि डुप्लेक्समधून होत असल्याचेही उघड झाले आहे. जिल्ह्यातील हिल्स स्टेशन तर या दलालांसांठी पैसा कमविण्यासाठी हुकमी स्थळे ठरली आहेत.

पोलिसांकडून थातूर-मातूर कारवाई होत असल्याने दलालांना पोलिस कारवाईची  कोणतीच भीती वाटत नाही. त्यामुळेच हा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावतच चालला आहे. हे दलाल त्यांच्याकडे टीव्ही अ‍ॅक्ट्रेस, मॉडेल, हवाई सुंदरी, परदेशी ललना असल्याचे सांगत तरूणाईल आकर्षित करीत असतात. हे वास्तव आजही पाहावयास मिळत आहे. या संदर्भात सामाजिक सुरक्षा विभागात काम केलेल्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, शहर किंवा ग्रामीण  पोलिसांना कधीच सेक्स रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त करता येणार नाही. या दलालांची पोलिसांची मिलीभगत यासाठी कारणीभूत आहे हे काम फक्त आणि  फक्त सी.आय.डी.च करू शकते.

या संदर्भात उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी चाकण परिसरात या वेश्याव्यवसायाने मोठा जोर धरला होता.चाकण एमआयडीसीतील उच्चशिक्षित कामगार हे त्यांचे मोठे गिर्‍हाईक होते. त्यामुळे अनेक लॉज कुंटणखाणे बनले होते. या दलालांच्या धंद्यामुळे स्थानिक तरूणाई वाहत जाऊ लागली होती. त्यामुळे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी या धंद्याविरोधात थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट सीआयडीलाच थेट कारवाई करण्याचे आदेश दिले. सीआयडी  अधिका-यांनीही तत्काळ काही लॉजेसवर छापामारी करून ठोस कारवाई केली होती. 

सीआयडीने केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब उघडकीस आली होती. सेक्स रॅकेट चालविणार्‍या दलालांचे स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांशी  (वसुलीवाले पोलिस)   साटेलोटे असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या चारही पोलिस कर्मचार्‍यांची तडकाफडकी जिल्ह्याबाहेर धुळे येथे बदली करण्यात आली  आणि त्यांची वरिष्ठांकडून चौकशी सुरू झाली. यामध्ये एका कर्मचार्‍याचा डान्स बार असल्याचा आरोप झाल्याने सीआयडीने त्या दिशेने तपास केला. या चौघाही  पोलिस कर्मचा-यांची अद्यापपर्यंत चौकशी सुरूच आहे. या कारवाईने या भ्रष्ट प्रवृत्तीच्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशाच प्रकारची कारवाई सीआयडीने फेसबुक, व्हॉटसअपवरून चालणार्‍या  वेश्या व्यवसायातील दलांलावर केली तरच हे रॅकेट समूळ नष्ट होईल असेही या सूत्राने स्पष्ट केले.