Wed, Apr 24, 2019 16:15होमपेज › Pune › शिक्षक बदल्यांची सीआयडी चौकशी करा

शिक्षक बदल्यांची सीआयडी चौकशी करा

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली; मात्र या बदली प्रक्रियेवर शिक्षकांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. झेडपीमध्ये अनेक हेलपाटे मारून देखील, त्यांच्या हातात काहीच मिळाले नसल्याने याचे पडसाद बुधवारी (दि. 20) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सदस्यांनी एनआयसीमार्फत राबविलेल्या या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, त्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनीही बदली प्रक्रियेतील गोंधळ  मान्य करत, यात जिल्हा परिषदेची बदमानी होत असल्याचे सांगितले. सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याच्या सूचना करून, तो अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, तसेच बदलीचे अधिकार पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेलाच मिळवेत, यासाठी शिफारस करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

शिक्षकांची बदली प्रक्रिया एनआयसीमार्फत तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने राबवली. मात्र, यात अनेक शिक्षक विस्थापित झाले, तर काही शाळांवर दोन शिक्षकांची नेमणूक झाली. याबाबत जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे यांनी प्रश्न उपस्थित करत, या बदल्यांवर आक्षेप घेतला. या प्रक्रियेत एनआयसी आणि शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी शिक्षकांकडून भ्रष्टाचार केला असून, त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या केल्या. यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाल्याचा आरोप केला.  त्याचबरोबर या प्रक्रियेची सीआयडी चौकशीची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या सूचनेला वीरधवल जगदाळे यांनी अनुमोदन देऊन, ठराव मांडण्याचा प्रस्ताव दिला. 

शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी ही प्रक्रिया राबविताना शिक्षकांनी भरलेली माहिती कुणी तपासली, शिक्षण विभागाला त्यांची माहिती कुणी दिली याचा प्रश्‍न अध्यक्षांना विचारला. यावर उत्तर देताना उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या त्या सॉफ्टवेअरबाबत थेट शिक्षण मंत्री तसेच शिक्षण सचिव आणि संचालकांनाच माहिती नाही. हे सॉफ्टवेअर चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले असून, त्याचा जाब विचारण्याचा अधिकारही आम्हाला नाही. या सॉफ्टवेअरमध्ये शिक्षकांना स्वतः माहिती भरायची होती.

यामध्ये बदल्यांच्या संदर्भात जे निर्णय आहेत, त्यांचा या सॉफ्टवेअरमध्ये अंतर्भाव नाही. तसेच अंतराच्या बाबीही चुकीच्या पद्धतीने भरल्या गेल्याने अनेक शिक्षकांना याचा फटका बसला. सर्व सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन तसा ठराव करून तो अहवाल राज्य शासनाला पाठवीला जाईल, असे वळसे पाटील म्हणाले. याला जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनीही अनुमोदन दिले.