Thu, Jan 24, 2019 07:42होमपेज › Pune › ‘पुढारी’तील बातमीची घेतली दखल; एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे

जीपीओ टपाल कार्यालयात अखेर बसवले ‘सीसीटीव्ही’

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:09PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

शहरातील अधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या टपाल विभागाच्या जीपीओ कार्यालयात अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यालयाच्या आसपास घडणार्‍या घटनांचे चित्रण होणे शक्य होणार आहे. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.

टपाल विभागाच्या जीपोओ कार्यालयात अंतर्गत दुरूस्तीमुळे काही सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले होते. त्यातच हे कॅमेरे चालविण्यासाठी आवश्यक असलेला डीव्हीआर सुध्दा काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे सर्वच कॅमेर्‍यांची यंत्रणा बंद पडली होती. या कार्यालयाच्या आवारात सुमारे चोवीस कॅमेरे बसविलेले होते. मात्र काढून टाकण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने पुन्हा बसविलेच नाहीत. त्यामुळे कार्यालयाच्या आसपास काय घटना घडत आहेत.

तसेच कार्यालयातील कर्मचारी जागेवर असतात का, याबाबत देखील माहिती या कॅमेर्‍यामुळे दिसत होती. परिणामी कामचुकार कर्मचार्‍यांना यामुळे चाप बसला होता. मात्र अंतर्गत दुरूस्तीमुळे डीव्हीआर काढल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते. अधिकार्‍यांकडून प्रशासनाकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याबाबत दै. ‘पुढारी’ने पाठपुरावा केला होता. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार कार्यालयात कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. जीपीओ कार्यालयात आणि आसपासच्या भागात सुमारे चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामधील सोळा कॅमेरे अगोदरच होते. आता त्यामध्ये आठ नवीन कॅमेर्‍याची भर पडली आहे. असे एकूण चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.