Mon, Aug 19, 2019 07:50होमपेज › Pune › लोणावळा लोकलमध्ये आता ‘तिसरा डोळा’

लोणावळा लोकलमध्ये आता ‘तिसरा डोळा’

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 10:17PMपुणे : निमिष गोखले 

पुणे- लोणावळादरम्यान धावणार्‍या उपनगरी लोकलमध्ये येत्या काही दिवसांत तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोणावळा लोकलमध्ये महिलांची छेड, भुरट्या चोर्‍या, लूटमार, किरकोळ कारणांमुळे हाणामारी या प्रकारांत गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सीसीटीव्हीमुळे  गुन्हेगारांना जरब बसून या प्रकारांमध्ये निश्‍चितच घट होईल. तसेच एखादा गुन्हा घडलाच तर त्याची उकल होण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे येत्या काळात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. 

दरम्यान, दुरांतो, शताब्दी एक्स्प्रेससह सर्व महत्त्वाच्या (प्रीमियर) रेल्वेंमध्ये 2020 अखेरपर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आधुनिक उपकरणेदेखील बसविणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे विभागाने आतापर्यंत 50 रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही बसविले असून जून महिन्यापर्यंत पुणे विभागातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर तिसर्‍या डोळ्याचा वॉच असणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे हाय एंड असून अंधुक प्रकाशातसुद्धा माणसाची प्रतिमा ते स्पष्टपणे टिपू शकणार आहेत. यामुळे रात्री किंवा पहाटेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर होणारी लूटमार थांबण्यास मदत होणार आहे. 

प्लॅटफॉर्मवर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दिशा रेल्वे रुळाकडे असणार असून, याद्वारे अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणार्‍यांवर देखील कारवाई होणार आहे. दरम्यान, अमरावती- पुणे एक्स्प्रेसमध्ये घोरपडीजवळ मागील वर्षी 27 ऑक्टोबर रोजी एका दाम्पत्याला लुटण्यात आले होते व त्यातील एकाला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्यात आले होते. पुणे-लोणावळा लोहमार्गावर पिंपरी ते तळेगाव, पुणे- दौंड लोहमार्गावर केडगाव ते दौंड स्थानकांदरम्यान रेल्वेमध्ये टोळ्यांकडून जबरी चोर्‍या, मंगळसूत्र हिसकावणे या प्रकारात सातत्याने वाढ होत असून रेल्वेसाठी ही चिंतेची बाब आहे. दौंड आउटर येथे बहुतांश रेल्वे सिग्नलसाठी रात्री-अपरात्री थांबल्यानंतर असे प्रकार घडतात. आरपीएफचे जवान बहुतांश वेळा डब्यांमध्ये उपस्थित नसतात. यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढल्याचे दिसून आले. येत्या काही महिन्यांमध्ये लांब पल्ल्याच्या व महत्त्वाच्या गाड्यांच्या प्रत्येक कोचमध्ये 8 सीसीटीव्ही बसविले जाणार असून, वाढत्या गुन्हेगारीला अटकाव बसू शकेल. 

स्टंटबाजीला बसणार अटकाव-

लोणावळा लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविल्यानंतर स्टंटबाजीला अटकाव बसू शकणार आहे. लोकलमध्ये स्टंटबाजी करून हकनाक जीव गमावणार्‍या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशांवर तिसर्‍या डोळ्याची निगराणी असणार असून कंट्रोल रुममध्ये त्याचे फुटेज पाहिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. 

सीसीटीव्हीची चाचणी सुरू

पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, सर्व महत्त्वाच्या रेल्वेंमध्ये ते बसविण्यात येतील. सध्या त्याची चाचणी व व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू आहे.  काही  स्थानकांवर यापूर्वीच सीसीटीव्ही बसविले गेले असून, निर्भया निधीअंतर्गत 18 उपनगरीय स्थानकांवर आणखी 550 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.     - डी. विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे विभाग