Tue, Jul 16, 2019 22:39होमपेज › Pune › पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच

पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 28 2018 11:57PMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसद्वारे प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणाहून बसेसने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री-अपरात्री महिलांना प्रवास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापार्श्‍वभुमीवर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमदार निलम गोर्‍हे यांनी 10 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पीएमपीएल महामंडळाच्या कार्यालयात मंगळवारी दि 26 महिलांसाठी सुसंवाद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार  उपस्थित होते.

आमदार गोर्‍हे म्हणाल्या, काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे. महिला अधिकार्‍यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहे. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली असून ते स्वागतार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीएमपी अध्यक्षा गुंडे म्हणाल्या, महिलांसाठी सुरु केलेल्या तेजस्विनी बससेवेला महिलांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील इतर मार्गावरही तेजस्विनी बससेवा सुरु करण्याची मागणी महिला प्रवासी करत आहेत. दरम्यान, नियोजनानुसार बस सोडल्या जात असून, पुढील काळात बसची संख्या वाढल्यास इतर मार्गावर सोडण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निता भरमकर यांनी आभार मानले.