होमपेज › Pune › दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेवर सीबीआयचा छापा

दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेवर सीबीआयचा छापा

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

केंद्रीय अन्वेषण विभागाने दि मुस्लिम को- ऑप. बँकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयासह राज्यातील 17  शाखांसह एकूण 32 ठिकाणी गुरुवारी छापे टाकले. यात बँक अधिकार्‍यांच्या पुणे, लोणावळा आणि बारामती येथील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. या वेळी या ठिकाणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करून महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे छापासत्र सुरु होते. अशी माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली. 

या प्रकरणी सीबीआयने बँकेच्या नऊ अधिकार्‍यांवर भारतीय दंडविधान संहितेच्या 120, 420, 471, 477 - ए तसेच कलम 13(2) नुसार  गुन्हा दाखल केला आहे.  नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर मुस्लीम को ऑप बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून वेगवेगळ्या शाखांमधून सुमारे 40 लाख रुपयांच्या 100 रुपये व 50 रुपयांच्या नोटा बदलून त्याजागी बंद केलेल्या 1 हजार व 500 रुपयांच्या नोटा ठेवल्या. त्यासाठी त्यांनी मुख्य शाखा आणि इतर शाखांमधील कॅश समरी बुक बदलून त्यात खोट्या नोंदी करत बँकिंगच्या नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून 1 हजार व 500 रुपयांच्या जून्या नोटा बदलल्या असल्याचे समोर आले. याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती सीबीआय सुत्रांनी दिली.

बँकेचे ठेवीदार, सभासदांनी घाबरून जाऊ नये : पी. ए. इनामदार 

दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत  गुरुवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी येऊन बँकेच्या एक-दोन नोंदवह्यांच्या प्रती घेतल्या, यापूर्वीही सीबीआय अधिकारी मुस्लिम बँकेत येऊन गेलेले आहेत; मात्र त्यांनी कोणत्या कारणासाठी बँकेला भेट दिली हे सांगितलेले नाही, असे बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

‘बँकेच्याच दोन संचालकांनी बँक व माझ्याविरुद्ध जाणूनबुजून तक्रारी केल्याचा किंवा सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीच्या कर्ज प्रकरणाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच राजकीय डावपेचाचा हा भाग असण्याची शक्यता आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच दबावतंत्राचा वापर करून कर्ज मिळावे किंवा अन्य फायदे मिळतात का हे पाहणे, हेदेखील कारण असू शकते. नोटबंदीच्या काळात अनेक सहकारी बँकांच्या नोंदी तपासल्या जात आहेत, त्या तपासणीचाही हा भाग असू शकतो. बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी घाबरून जाऊ नये ’ असेही डॉ. पी. ए. इनामदार यांनी म्हटले आहे.