Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Pune › आत्मपरीक्षणास भाग पाडणारा निकाल

आत्मपरीक्षणास भाग पाडणारा निकाल

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : पांडुरंग सांडभोर

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुजा कोद्रे विजयी झाल्या. मात्र, तरीही हा निकाल अनपेक्षित असाच म्हणावा लागणार आहे. कारण या निवडणुकीत सत्ताधारी भाजप थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. अवघ्या वर्षभरातच भाजपची पिछेहाट झाली, ही धक्कादायक बाब असून खर्‍या अर्थाने सत्ताधार्‍यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल ठरला आहे.

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनाने मुंढवा-हडपसर या प्रभाग क्र. 22 क  या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. एक सुसंस्कृत राजकारणी आणि कार्यक्षम नगरसेविका असलेल्या कोद्रे यांच्या निधनामुळे होत असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. साधारण आठ- दहा महिन्यांपूर्वी उपमहापौर नवनाथ कांबळे यांचेही आकस्मिकरित्या निधन झाले, त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी भाजप आणि रिपाईने प्रयत्न केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक झाली. त्यातही अपेक्षेप्रमाणे कांबळे यांच्या कन्या विजयी झाल्या. त्यामुळे मुंढव्याच्या पोटनिवडणुकीतही भाजपने उमेदवार उभा करून राष्ट्रवादीचे उट्टे काढले. मात्र, राष्ट्रवादीला धडा शिकविण्यास निघालेल्या भाजपलाच तोंडघशी पडावे लागले. 

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्व. चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा कोद्रे यांना उमेदवारी दिली, तर भाजपने गत महापालिका निवडणुकीतील उमेदवार सुकन्या गायकवाड यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, शिवसेनेही मोनिका तुपे यांना उमेदवारी देऊन, निवडणुक तिरंगी केली. कोद्रे यांना सहानुभूतीचा फायदा मिळणार हे जवळपास स्पष्ट होते. मात्र, सुकन्या यांचा चेहरा मतदारापर्यंत पोहचला असल्याने फायदा होईल अशी अटकळ बांधली जात होती. याशिवाय सत्ता असल्याने त्याचाही प्रभाव पडेल. त्यामुळे लढत सोपी होईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र, या लढतीत सुकन्या नव्हत्याच हे निकालाने दाखवून दिले. 

गतवर्षी फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत कोद्रे-गायकवाड अशी सरळ लढत झाली होती. भाजपची ‘सुनामी’ असतानाही येथे घड्याळ्याने अचूक वेळ साधली होती आणि त्यांचे चारही उमेदवार निवडून आले होते. या लढतीत कोद्रे यांना 14 हजार 676, तर भाजपच्या गायकवाड यांना 11 हजार 477 मते मिळाली होती.  सेनेच्या सुवर्णा जगताप यांना 5 हजार 206 मते मिळाली होती. कोद्रे आणि गायकवाड यांच्या मतात जवळपास 3 हजार मतांचा फरक होता. वर्षभरानंतर मात्र भाजपची अवस्था बिकट झाली आहे. पराभवातील मतांच्या आकड्यांचा फरक वाढला आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधार्‍यांना याचा विचार करावा लागणार आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला ताकद वाढविता आलेली नाही, हे या निमित्ताने दिसून आले आहे. 

या निवडणुकीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपबाबत जो कल आहे, तो या निवडणुकीतून दिसणार होता. त्याच बरोबर आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम होती. त्यामुळे हडपसरचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी विशेष लक्ष घातले होते. राष्ट्रवादीनेही आगामी गणिते लक्षात घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली होती. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी स्वतः या निवडणुकीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. दुसरी महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे ही निवडणूक अत्यंत सोपी ठरली, काँग्रेसची नेते मंडळी अगदी हिरीरीने प्रचारात दिसली, त्याचाही फायदा झाला. आगामी निवडणुकीत हेच चित्र कायम राहिल्यास आघाडीच्या उमेदवार हडपसरमध्ये नक्कीच परिवर्तन घडू शकतो.

तर दुसर्‍या बाजूने भाजपसाठी या निवडणुकीने धोक्याची घंटा वाजविली आहे. शहरात फारसे अस्तित्व नसलेल्या सेनेने दुसर्‍या क्रमांकावर उडी घेतली आहे. ज्या सेनेला भाजप आता गोजारण्याचा प्रयत्न करीत आहे तिचं आता भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून आले. त्याच बरोबर भाजप आणि सेना युतीने एकत्र येऊन ही निवडणुक लढविली असती तर कदाचित या निकालाचे चित्र वेगळं असतं हेही दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकासाठी ‘आरसा’ ठरली आहे.