Tue, Mar 19, 2019 05:35होमपेज › Pune › जूनअखेर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल

जूनअखेर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 1:00AMपुणे : देवेंद्र जैन

राज्य पोलिस दलात 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठे फेरबदल होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 
राज्यात 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होण्याची शक्यता असल्याने, या निवडणुका योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वतः लक्ष घालून पोलिस अधिकार्‍यांच्या नेमणुका करणार आहेत. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, इच्छुक अधिकार्‍यांनी मनाजोगी नेमणूक व्हावी यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. 

कार्यकाळ संपूनही अनेक जण प्रतीक्षेत
पोलिस दलात क्रमांक दोनचे पद असलेले, राज्य लाचलुचपत खात्याचे महासंचालकपद हे अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात सद्यःस्थितीत कार्यरत असणार्‍या दोन अतिरिक्त पोलिस महासंचालकांचा सेवाकाळ उलटून गेला आहे. राज्य कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला, नवी मुंबईचे हेमंत नगराळे, नागपूरचे वेंकटेशन, नाशिकचे  रवींद्र सिंघल या सर्वांचा कार्यकाळही उलटून गेला असूनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत, मात्र आता 2019 च्या निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व बदल्या होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुढील बदल्यांकरिता अनेकांनी आपले‘ देव पाण्यात’ ठेवले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या अधिसूचनेवरून संभ्रम 
पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या नवीन पोलिस आयुक्तालयात अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक होईल. पण सरकारने ही अधिसूचना, मुंबई पोलिस कायदा कलम 7 नुसार न काढल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

संवेदनशील असलेल्या औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्तपद पण बरेच महिने रिक्त होते. तेथे मोठी जातीय दंगल होऊन देखील राज्य सरकारला हे पद भरता आले नाही. नागरिकांमधील क्षोभ वाढल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजिवी प्रसाद यांची तेथे नेमणूक केली. काही विशिष्ट अधिकार्‍यांचा कार्यकाळ हा पुणे, मुंबई या परिक्षेत्रात अनेक वर्षांपासुन सुरू आहे, त्याला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचे आहे,  असे अनेक पोलिस अधिकारी खासगीत सांगतात. 

जून महिन्याच्या अखेरीस पोलिस महासंचालक सतीश माथूर, आणि मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर हे ऑगस्टअखेर निवृत्त होत आहेत. पोलिस महासंचालक एस. पी. यादव हे सप्टेंबरअखेर व अतिरिक्त पोलिस महासंचालक वि. डी. मिश्रा या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. या अधिकार्‍यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे पोलिस दलातील अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.