Thu, Jul 18, 2019 17:04होमपेज › Pune › जूनअखेर द्यावे लागणार ‘जातपडताळणी’

जूनअखेर द्यावे लागणार ‘जातपडताळणी’

Published On: Jun 19 2018 1:27AM | Last Updated: Jun 19 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी  

राज्यभरातील  अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट या आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक केलेले जातपडताळणी प्रमाणपत्र जूनअखेर घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी रांगेत उभ्या असलेल्या लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जर हे प्रमाणपत्र 28 जूनपर्यंत सादर केले नाही तर त्यांचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून केला जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यातच काही विद्यार्थ्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. काही विद्यार्थी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. मात्र राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कोणत्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कधी सादर करायचे याचे एक परिपत्रक जाहीर केले आहे.

या परिपत्रकानुसार, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना 23 जूनपर्यंत अर्जासोबत जातपडताळणीची पावती जोडायची आहे. 24 जूनला अंतिम यादी जाहीर होणार आहे, तर 27 जूनला या विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्रांवर सादर करायचे आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यंत अर्जासोबत जातपडताळणीची पावती जोडायची आहे. 23 जूनला अंतिम यादी जाहीर होणार आहे. तर 27 जूनला या विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्रांवर सादर करायचे आहे. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना 24 जूनपर्यंत अर्जासोबत जातपडताळणीची पावती जोडायची आहे. 25 जूनला अंतिम यादी जाहीर होणार आहे. तर 27 जूनला या विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्रांवर सादर करायचे आहे. 

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत अर्जासोबत जातपडताळणीची पावती जोडायची आहे. 27 जूनला अंतिम यादी जाहीर होणार आहे. 28 जूनला या विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्रांवर सादर करायचे आहे. विद्यार्थी जर प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तर या विद्यार्थ्यांचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे देखील परिपत्रकात नमूद केले आहे.