Mon, Aug 26, 2019 10:16होमपेज › Pune › जानेवारीअखेरपर्यंत बोचरी थंडी

जानेवारीअखेरपर्यंत बोचरी थंडी

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:58AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जेव्हा हवेचे दाब वाढतात, तेव्हा किमान तापमानात लक्षणीय घट होते. सध्या उत्तर भारतात हवेचा दाब वाढला असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिथंड व कोरडे वारे थेट वाहत आहेत. त्याचबरोबर राज्यातील वातावरण निरभ्र असून, यामुळे कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सध्या थंडीची लाट असून, जानेवारी अखेरपर्यंत या भागामध्ये बोचरी थंडी कायम राहणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना व्यक्त केला आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

असून, रक्‍त गोठावणार्‍या थंडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागातील किमान तापमान 6 अंशांपर्यंत खाली घसरू शकते. कोकण, मुंबईत मात्र अद्यापही बोचरी थंडी पडली नसून तिथे सरासरी 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात येत आहे. 

अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढले असून, पाणी उशिरा थंड होते. सध्या अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असून, आद्रतेचे प्रमाण अधिक आहे. सह्याद्री पर्वत रांगेला हे आद्रतायुक्त वारे अडले जात असून, यामुळे मुंबई, कोकणात थंडी पडली नसल्याचे निरीक्षण साबळे यांनी नोंदविले आहे.