Wed, Apr 24, 2019 20:00होमपेज › Pune › कंपनी स्थापन करून २२ लाखांचा गंडा

कंपनी स्थापन करून २२ लाखांचा गंडा

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

प्लेसमेंट (नोकरी लावून देणारी) कंपनीत काम करणार्‍याने स्वतःच्या नावावर दुसरी एक कंपनी स्थापन करून 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काम करणार्‍या कंपनीतील ग्राहकांची माहिती चोरून गंडा घातला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी ऋषिता व्होरा (वय 32, रा. वसंत विहार, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल सोनटक्के (वय 26, रा. आकुर्डी) व त्याच्या साथीदार महिलेसह इतरांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीची बाणेर परिसरात एच. आर. रेमेडी इंडिया ही प्लेसमेंट (नोकरी लावून देणारी) कंपनी आहे. याठिकाणी आरोपी राहुल सोनटक्के हा टीम लीडर म्हणून नोकरी करीत होता. त्यावेळी राहुल याने स्वत:च्या नावाने एम्प्लोवा एच. आर. सर्व्हिसेस ओ.पी.सी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केली. त्याच्या कंपनीत एच. आर. एक्झिकेटिव्ह म्हणून एका महिलेला तसेच व इतरांना नोकरीस ठेवले. 

मात्र, आरोपी राहुल याने तो काम करत असलेल्या एच. आर. रेमेडी इंडिया या कंपनीतील ग्राहक मिळविले. तसेच, या कंपनीतील डाटा चोरून स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. तर, नावावर स्थापन केलेल्या कंपनीसाठी फिर्यादी यांच्या पतीच्याच कंपनीतील कॉम्प्युटर तसेच इंटरनेटचा वापर केला. ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या पतीच्या कंपनीची 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.