Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Pune › ‘अक्षय्य’ सोने खरेदीत 20 टक्क्यांची वाढ शक्य

‘अक्षय्य’ सोने खरेदीत 20 टक्क्यांची वाढ शक्य

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:30AM
ऋतुजा मोरे-कुलकर्णी 

पुणे : आगामी लग्नसराईचा हंगाम, बाजारातील सकारात्मकता आणि किंमतीतील स्थिरता यांच्या जोरावर अक्षयतृतीयेच्या दिवशी पुण्यात सोन्याच्या व्यवहारात 15 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता ज्वेलर्सनी व्यक्त केली आहे. 

या वर्षी सोन्याच्या किंमती स्थिर असून अंदाजे 31 हजार 500 रुपये प्रति तोळा असा दर सर्वसाधारणपणे कायम राहिल. लग्नसराईच्या हंगामाचाही त्याला हातभार लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षयतृतीयेच्या दिवशी सोन्याच्या विक्रीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी व्यक्त केले. त्यातही विशेषकरुन लग्नसराई असल्याने ट्रेंडी ज्वेलरीला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. मात्र किंमतीची विशिष्ट वर्गातील ज्वेलरीमध्ये फारशी मागणी दिसत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्याचा तरुण वर्ग परंपरागत कौटुंबिक ज्वेलरीच्या दुकानातून सोने खरेदी करण्यासाठी अधिक प्राधान्य देत आहेत. गतवर्षी मान्सूनही चांगला होता. पण मागणी फारशी नव्हती. त्यामुळेच यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी हि-यापेक्षा नाणी, छोटी बिस्कीट्स आणि लग्नातील ट्रेंडी दागिने यांना अधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. अक्षय तृतीयेच्या दिवशीच दागिन्यांची डिलिव्हरी नेणे पसंत करणार्‍यांंची संख्याही अधिक आहे.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक टी एस. कल्याणरमण यांच्या म्हणण्यानुसार, या दिवशी सोने खरेदीचे परंपरागत मूल्य बाजारात परत येईल अशी अपेक्षा आहे. बाजारातील सकारात्मकता आणि असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे झालेली वाटचाल यांमुळे यंदाच्या वर्षी चांगली विक्री होण्याची शक्यता आहे.

रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नक्कीच ग्राहकांच्या सोने खरेदीसाठी बाजारात येतील असा विश्‍वास व्यक्त केला आहे.  सोन्याची किंमत या आठवड्यात चांगली वाढली आहे. या सेगमेंटमधील ग्राहकांचा विश्वास परत येत असून यंदा ग्राहकांचा सोने खरेदीला समाधानकारक प्रतिसाद लाभेल. ही अक्षय्य तृतीया महिन्याच्या मध्यात आणि आठवड्यातील मधल्याच दिवसांत (बुधवारी) आली आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा संपून सुट्या लागल्या आहेत. जागतिक पातळीवर पाहता अमेरिका व चीनमधील व्यापारी तणावामुळे  राजकीय व आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण असल्याने सोन्याच्या किंमती तेजीतच राहण्याचे चित्र आहे. ग्राहकांनी या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मागणी नोंदवणे सुरु केले आहे. पूर्वीइतकी ग्राहकांची झुंबड या अक्षय्य तृतियेला होणे अपेक्षित नसले तरी वरील घटक लक्षात घेता या खेपेस खरेदीला संतुलित व समाधानकारक प्रतिसाद मिळेल. गेल्या वर्षीच्या विक्रीमध्ये पाच ते दहा टक्के वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे मत इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालन सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.