होमपेज › Pune › जि.प.च्या वादग्रस्त पुस्तक खरेदीचे वाढते गूढ

जि.प.च्या वादग्रस्त पुस्तक खरेदीचे वाढते गूढ

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:55AMपुणे : गणेश खळदकर 

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दलित वाचनालयांसाठी 2017-18 या वर्षासाठी ई-निविदा पद्धतीने तब्बल 78 लाख 24 हजार 880 रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. परंतु, ही पुस्तके निरुपयोगी; तसेच कालबाह्य असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी देखील सुरू झाली आहे. परंतु, तक्रारकर्त्याने घुमजाव करत आपल्या शंकांचे निरसन झाल्याचे दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे खरेदी करण्यात आलेल्या कालबाह्य पुस्तकांच्या खरेदीचे गूढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील दलित वाचनालयांसाठी तब्बल 78 लाख 24 हजार 880 रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे.

यासंदर्भात अमोल सातपुते यांनी जिल्हा परिषदेकडे 19 मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडून जी पुस्तके खरेदी करण्यात आली. या पुस्तकांच्या खरेदीतील पारदकर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रातील एकाही मान्यवर प्रकाशकांची किंवा लेखकांची पुस्तके खरेदी करण्यात आली नाहीत. पुस्तके कालबाह्य आणि 80 ते 85 टक्के सवलतीत बाजारात उपलब्ध आहेत. पुस्तक खरेदी करताना निवड समितीची नियुक्तीच केली गेली नाही. जी पुस्तक खरेदी झाली ती पुस्तके जुनाट, कालबाह्य आणि या पुस्तकांचे बाजारमूल्य हे केवळ 8 लाख रुपये आहे. खरेदी करण्यात आलेली पुस्तके ही एकप्रकारची रद्दीच असून, वाचनालयातील एकही वाचक पुस्तक वाचणार नाही, अशा प्रकारची ही पुस्तके आहेत. पुस्तक खरेदीसाठी जी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली ती, ठराविक प्रकाशन संस्थाच डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आली.

त्यामुळे ठराविक प्रकाशन संस्थांचे हित यामध्ये जपण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दलित वाचनालयांमधून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी  उत्तमोत्तम पुस्तके देणे गरजेचे असताना कालबाह्य आणि चालू वर्षाच्या अभ्यासक्रमात नसलेल्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली असल्याचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे या सर्वच पुस्तकांची झालेली खरेदी पुरवठादार आणि संबंधित अधिकारी यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून खरेदी केल्याचे दिसून येत असून, केवळ अधिकारी आणि पुरवठादार यांचे उखळ पांढरे करण्यासाठीच अशा प्रकारच्या खरेदीचा घाट घातला गेला असल्याचे देखील तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांची तक्रार प्राप्‍त झाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे सांगितले आहे, तर तक्रारकर्त्याने घुमजाव करत शंकेचे निरसन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून नेमके कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी कालबाह्य पुस्तकांची खरेदी झाली याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेकडून जी कालबाह्य पुस्तके खरेदी करण्यात आली. यासंदर्भात ज्या शंका उपस्थित केल्या होत्या, त्या शंकांचे निरसन झाले आहे. परंतु पुढे या प्रकरणाची कशी चौकशी करायची याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांनी घ्यायचा आहे.  - अमोल सातपुते, तक्रारकर्ता 

 

Tags : pune, pune news, pune zp, controversial book,