Mon, Aug 19, 2019 18:30होमपेज › Pune › तक्रार ३० लाखांची पण नोंद ८० हजाराची

तक्रार ३० लाखांची पण नोंद ८० हजाराची

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिसांच्या कारनाम्यांनी शहर ढवळून निघालेले असताना कोथरूड पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला असून, व्यापार्‍याची तक्रार 30 लाखांची पण कोथरूड पोलिसांनी नोंद मात्र केवळ 80 हजाराची घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच काय तर, सीसीटीव्हीत चोरी करताना चौघे कैद झाले असताना दोघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडे याबाबत विचारपूस केल्यानंतर व्यापार्‍याला ‘चोरी कितीही असली तरी, ती चोरीच असते’ म्हणत त्यांना शहानपण शिकविले आहे. संबंधित व्यापार्‍याने पोलिस आयुक्तांकडे तक्रारकरून याबाबत दाद मागितली आहे. 

कोथरूड परिसरात विष्णाराम छात्ताराम चौधरी (रा. कोथरूड) यांचे डी.पी. रोडवर बालाजी ट्रेडर्स किराणा व भुसार दुकान आहे. त्यांच्या दुकानात एकूण सहा कामगार असून, विष्णाराम चौधरी व कामगार एकत्र राहतात. हिशोबात घोळ करत असल्याने चार महिन्यांपूर्वी त्यांनी दोन कामगारांना कामावरून कमी केले. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी दुकानात सीसीटीव्ही बसिवले आहेत. 

विष्णाराम यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. 27 एप्रिल) सकाळी दुकान उघडल्यानंतर तेलाचे डब्बे व ड्रायफुडसह काही माल गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी दुकानातील एक कामगार व चार महिन्यांपुर्वी कामावरून कमी केलेल्या दोघे असे चौघेजण दुकानत चोरी करताना आढळून आले. त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी तक्रार घेतली. परंतु, ती एकाच दिवसाची चोरी झाल्याची.

त्यात केवळ 80 हजाराचा माल गेल्याची तक्रार नमूद केले. तर, आरोपी चार असताना त्यात दोन आरोपींचीच नावे टाकण्यात आली. चौधरी यांनी याबाबत पोलिसांना 4 एप्रिल पासून हा प्रकार सुरू आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. 4 ते 27 एप्रिल या कालावधीत 30 लाखांच्या जवळपास माल गेला असून, सीसीटीव्हीत चौघे असल्याचे दिसत असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज पाहणे तर सोडात पण घेतलेही नाही. तसेच, तक्रारीबाबत त्यांचे म्हणणेही एकूण घेतले नाही.