Wed, Apr 24, 2019 01:48होमपेज › Pune › पिंपरी महापालिका स्वत: खरेदी करणार बसेस

पिंपरी महापालिका स्वत: खरेदी करणार बसेस

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 12:46AMपिंपरी : पीएमपीएलकडून बस खरेदीमध्ये विलंब होत आहे. एकूण 1 हजार 550 पैकी केवळ 200 बस गेल्या 2 वर्षांत खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिका स्वत: बस खरेदी करून पीएमपीएलला देणार आहे. 

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचा पीएमपीएलमध्ये 40:60 या प्रमाणात हिस्सा आहे. त्यानुसार दोन्ही पालिका एकूण 1 हजार 550 बस खरेदी करणार होता. तसा निर्णय 23 ऑगस्ट 2016च्या पालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या पैकी 550 बस वातानुकूलित असून त्या ‘एएसआरटीयू’ या केंद्र शासनाच्या अंगीकृत संस्थेकडून घेण्यात येणार होत्या. दोन्ही महापालिका 60:40 या तत्त्वानुसार 100 बसेस खरेदी करणार होते. तर, उर्वरित 900 बसेस मार्केट फायनान्स मेकॅनिझमकडून घेण्यात येणार होत्या. 

मात्र, आतापर्यंत पीएमपीएलने केवळ 200 बस खरेदी केल्या आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही पीएमपीएलकडून बस खरेदीस विलंब होत आहे. पुरेशा संख्येने बसेस शहरातून फिरत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पीएमपीएलच्या मागणीनुसार व स्पेसिफिकेशननुसार पालिका स्वत: बसेस खरेदी करणार आहे. खरेदीनंतर त्या पीएमपीएलला देणार आहे. या निर्णयास स्थायी समितीने 18 जुलैला मंजुरी दिली आहे. या धोरणात्मक निर्णयास अंतिम मान्यता मिळावी म्हणून हा प्रस्ताव 20 ऑगस्टला होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.