Sun, Mar 24, 2019 04:58होमपेज › Pune › कॅशलेसचा अनोखा प्रयोग, थम्ब करुन मिळणार बसचे तिकीट

अनोखा प्रयोग; थम्ब करुन मिळणार बसचे तिकीट

Published On: Jan 15 2018 7:26AM | Last Updated: Jan 15 2018 9:41AM

बुकमार्क करा
पिंपरी : वर्षा कांबळे 

सध्या डिजिटल युगामध्ये अनेक प्रकारचे डिजिटल ई - तंत्रज्ञान विकसित होताना दिसत आहे. मोबाईल रिचार्ज, वीजबील, रेल्वे व एसटी, खासगी बसचे तिकिट आदींचे पेमेंट सर्वसामान्य नागरिकही ऑनलाईन करताना दिसतात. मात्र, रोजच पीएमएमपीएलएम सारख्या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुटे पैसे बाळगण्याशिवाय आजही गत्यंतर नाही. या प्रवाशांच्या सोयीसाठी थम्ब करुन तिकिट मिळेल असे अनोखे डिवाईस काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या प्राध्यपकाने तयार केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आकुर्डी येथे राहणारे प्रा. आशिष पवार, किरण गिरासे (अमोदे), प्रथमेश भोसले, अनिकेत हडके यांनी मिळून ‘बायोमेट्रीक ई - सिस्टिम फॉर कॅशलेस टिकिटिंग मेन्टेनेन्स ऑफ ट्रान्सिट रेकॉर्ड इन बस ट्रान्सपोर्टेशन’ हे डिवाईस तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या सिस्टिममध्ये कंडक्टरकडे एक डिवाईस असणार आहे. ते शहरातील मेन डेपोंशी कनेक्टेड असणार आहे. बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टर कुठे जायचे हे विचारेल आणि डिवाईसवर थम्ब करण्यास सांगेल. थम्ब केल्यानंतर  प्रवाशाला तिकिटाचा एक मेसेज येईल आणि हाच मेसेज कंडक्टर आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होईल. 

डिवाईसचे काम कशा प्रकारे चालते : यामध्ये पैशाची देवाण -घेवाण कशी असेल याविषयी प्रत्येकाच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आता प्रत्येक आधारकार्डला अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर लिंक आहे. त्यामुळे जेव्हा प्रवासी थम्ब करेल तेव्हा जेवढ्या रकमेचे तिकिट असेल तेवढी रक्कम डायरेक्ट कंटक्टरच्या डिवायसमध्ये किंवा सर्व्हरला जमा होईल. हा मेसेज प्रवासी व कंटक्टरकडे असणार्‍या डिवाईसमध्ये आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होणार आहे. 

अशा प्रकारची सिस्टिम जर बस सेवेमध्ये उपयोगात आणली तर कधीकाळी प्रवाशाला अचानक बाहेर जावे लागले  आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तरी प्रवासी फक्त आपला थम्ब वापरुन प्रवास करु शकतो. तसेच बनावट पास किंवा काही वेळा ज्येष्ठ नागरिकांची बनावट कार्ड असतील तर तेही या डिवाईसवरुन समजू शकेल कारण प्रवासी जेव्हा थम्ब करेल त्यावेळी आधारलिंकवरुन त्याचे खरे वय समजेल. असे आशिष पवार यांनी सांगितले.