Wed, Jul 17, 2019 10:12होमपेज › Pune › बस हाऊसफुल, मग पीएमपी तोट्यात कशी

बस हाऊसफुल, मग पीएमपी तोट्यात कशी

Published On: Sep 06 2018 1:49AM | Last Updated: Sep 06 2018 1:45AMपुणे ः प्रतिनिधी 

तुकाराम मुंडे यांच्यासारखा सक्षम अधिकारी पाच वर्षासाठी न ठेवता त्यांची तडकाफडकी बदली कुणाच्या दबावाखाली झाली ? कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई आणि काम करणार्‍यांचा सन्मान का होत नाही ? संचालक मंडळाची आवश्यकता आहे का ? की राजकीय सोय म्हणून या मंडळाची निर्मिती केली आहे ? पीएमपीएमएल बस प्रवाशांनी हाऊसफुल असतात मग पीएमपीएमएल तोट्यात कशी ? असे एक नाही अनेक प्रश्‍नांचा भडीमार करत राजकीय नेते, अधिकारी बसचा प्रवास करत नाहीत, त्यामुळे त्यांना बस सेवेची दुरवस्था दिसत नाही, असा संताप प्रवासी नागरिकांनी व्यक्त केला. 

महापालिकेच्या वतीने बुधवारी पीएमपीएमएल सेवेच्या प्रश्‍नावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सह-व्यवस्थापकीय संचालक चारटनकर, वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पालिकेचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, गायत्री खडके उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील प्रवाशांनी व प्रवासी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेत पीएमपीएमएल सेवेतील त्रुटींचा पाढा वाचला. 

बस वेळेवर येत नाहीत, बस चालक आणि वाहक प्रवाशांशी व इतर वहानचालकांशी उद्धटपणे वागतात, बोलतात, गाड्या भरून वाहतात, तरीही बस सेवा तोट्यात का, याला ठेकेदारी पद्धत कारणीभूत असून ठेकेदारी पद्धत रद्द करावी, बस सेवा नफ्यात आणण्यासाठी अभ्यास समिती गठीत करा, पाच रुपयात पाच किलो मिटर प्रवास योजना सुरु करा, टप्पा पद्धतीने तिकीट पद्धतीमुळे प्रवास न करता पैसे द्यावे लागतात. त्यामुळे कि.मी. पद्धतीने तिकीट सुरू करा, बसचे बोर्ड डिजिटल करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. हजार गाड्या बाद झाल्या तरी नवीन पाचशे गाड्या येत नाहीत. आयुर्मान कमी झालेल्या गाड्या वापरात आहेत. बीआरटीवर खर्च न करता नव्या गाड्या खरेदी केल्या तर मेट्रोचीही गरज भासली नसती. तुकाराम मुंडे आले त्यांचा अभ्यास झाला, मात्र लगेच बदली केली, असे आक्षेपही यावेळी नागरिकांनी नोंदविले. 

शहरातील बससेवा सक्षम करण्यासाठी तेजस्विनी 200 मीडी गाड्या घेतल्या आहेत, 400 सीएनजी बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. या बससाठी ऑक्टोबर नोव्हेंबर टेंडर प्रक्रिया होऊन या बस जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतील, 33 मीडी बसेस येणार आहेत, 500 ई-बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. यातील जानेवारीत 25 बसेस, पहिल्या टप्प्यात 150 गाड्या आणि दुसर्‍या टप्प्यात 350 बसेस खरेदी केल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी नयना गुंडे यांनी दिली. तर नागरिकांच्या अडचणी दूर करून सदोष सेवा देण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.