Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Pune › दिवसा सत्संग अन् रात्री घरफोड्या

दिवसा सत्संग अन् रात्री घरफोड्या

Published On: Feb 08 2019 1:19AM | Last Updated: Feb 08 2019 1:19AM
पुणे : प्रतिनिधी

तुम्ही दृष्यम चित्रपट पाहिला असेलच, त्यामध्ये आपल्यावरील गुन्हा सिद्ध होऊ नये म्हणून चित्रपटातील नायक त्या दिवशी आपण सत्संगला असल्याचे दाखवितोे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण होतो याचे चित्रीकरण पुरावा म्हणून सादर करतो. अगदी या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. आपण रात्री चोर्‍या करतोय, याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी चक्क सत्संगला जाण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर कोणाला संशयच आला तर दाखविण्यासाठी ओळखपत्रदेखील तयार केले; मात्र पोलिसांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. आणि अखेर एकेदिवशी त्यांचे बिंग फुटले.

सत्संग शिबिरामध्ये राहून सत्संगी असल्याचे भासवत घरफोड्या करणार्‍या दोन सराईतांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर दत्तात्रेय भालेराव (वय 21, रा. मांजरी हडपसर) आणि स्वप्निल नामदेव गिरमे (वय 24, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 11 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी त्यांच्याकडून 131 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 दुचाकी, 10 मोबाईल फोन, 2 एलसीडी, 1 कॅमेरा, 26 हजार रुपये रोख असा 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील वाढत्या घरफोडीचे प्रमाण पाहता हडपसर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार पोलिस शिपाई नितीन मुंढे यांना आळंदी येथे सत्संग शिबिरामध्ये राहणारे दोघेजण हे हडपसर भागात चोर्‍या करीत असून, ते चोरीचे सोने विकण्यासाठी हडपसर मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी दागिने हडपसर भागातून चोरले असून, ते विकण्यासाठी मार्केटला आल्याचे सांगितले. आरोपी हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर शहर व परिसरात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

आळंदीत मुक्काम

आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय होता;  आरोपी नेमकं काय करतात, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनीदेखील त्याच परिसरात एक खोली काही दिवस भाड्याने घेतली त्यांच्यावर पोलिस बारीक नजर ठेवून होते. मात्र,भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने आरोपी जसे बाहेर पडले तसे शहरात आतमध्ये आले आणि त्यांचे बिंग फुटले. सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहपोलिस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.