Tue, Jul 16, 2019 21:58होमपेज › Pune › पुन्हा बैलगाडा शर्यतींचे गाजर!

पुन्हा बैलगाडा शर्यतींचे गाजर!

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:37PM-सुहास जगताप

बैलगाडा शर्यती हा आता पुणे जिल्ह्यातील एक राजकीय प्रश्न झाला आहे. न्यायालयीन चक्रात हा विषय अडकला असून कोणालाच यामध्ये मार्ग काढता येत नसल्याने नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात हा मुद्दा कळीचा झाला आहे आणि तो नेत्यांना सुटता सुटेना.  हा प्रश्न सुटण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करत असून सुटला तर आपल्यामुळेच हे म्हणण्यास वाव राहावा, अशी धडपड सर्वपक्षीय नेत्यांची सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही मंचर येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. 1 जुलै) हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून न्यायालयात चांगले वकील देऊ, असे आश्वासन देऊन टाकले. तमिळनाडूत जलीकट्टूवर बंदी आली आणि ती उठली तरी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती बंदीचे गुर्‍हाळ अजूनही सुरूच आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सुटतो का आणि न सुटल्यास नेते मंडळी कोणती आश्वासने देणार याबाबत उत्सुकता आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदीमुळे शेतकर्‍यांमध्ये अत्यंत संतापाची भावना आहे. बंदीमुळे गावातील यात्रांची रया गेलेली आहे. तसेच बैल पाळणे, खरेदी-विक्री, बैलगाडा बनविणे आणि शर्यतीच्या अनुषंगाने इतर सेवा पुरविणे अशा फार मोठ्या अर्थकारणावर परिणाम झालेला आहे. बैलगाडा शर्यतींना एक भावनिक किनार आहे. अनेक लोक देवाच्या यात्रेत बैलगाडा फिरवू, असे नवस बोलण्याची परंपराही खंडित होत आहे.

दरम्यान, बैलगाडा शर्यतीच्या आखाड्यात मंचरमध्ये आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही उडी घेतली. ते म्हणाले, बैलगाडा शैर्यतींमध्ये नव्हे, तर प्लास्टिक खाऊन राज्यात कित्येक गाई-बैल मृत्युमुखी पडत आहेत, हे न्यायालयाने समजून घ्यायला पाहिजे. पशुधन सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून चांगले वकील देऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याचवेळी पालकमंत्री तथा अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट म्हणाले, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. परंतु न्यायालयाचा मान राखला पाहिजे. तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शर्यती सुरू  न झाल्यास मी राजीनामा देईन, असे 2012  ला म्हटले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शर्यती सुरू  झाल्या. त्यानंतर पुन्हा 2014 ला शर्यतीवर बंदी आली आहे. परंतु मी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकंदरीत बैलगाडा शर्यतीवर पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकीय घमासान होण्याची चिन्हे आहेत.

पालख्यांच्या प्रस्थानानंतरही पावसाची दडीच

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. वर्षानुवर्षाप्रमाणेच पालखी सोहळ्याच्या सुविधांबाबत मोठा गोंधळ आहे. पालखी तळ, पालखी मार्ग येथे अनेक अडचणी आहेत. प्रशासकीय यंत्रणा वारकर्‍यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने वारकर्‍यांना पाणी पुरविण्याची  जबाबदारी यावर्षी प्रशासनाला पार पाडावी लागेल. श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झालेले आहे.

पुणे शहरातील प्रमुख मुक्कामानंतर पालख्या आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या भक्तिमय वातावरण आहे. माउलींची पालखी दि. 13 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल, तर संत तुकाराम महाराजांची पालखी  दि. 17 जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात मार्गक्रमण करीत राहील. याबरोबरच अनेक दिंड्या आणि इतरही संतांच्या पालख्या आपापल्या गावातून पंढरीकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या भक्तिमय वातावरण आहे. गावोगावी वारकर्‍यांच्या सेवेसाठी निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये शासकीय यंत्रणेबरोबरच स्थानिक ग्रामस्थ, तसेच स्वयंसेवी संस्था आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. निरनिराळ्या संस्था वारकर्‍यांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

पावसाने ओढ दिल्याने वारकर्‍यांची वाट बिकट झालेली आहे. माउली व तुकाराम महाराजांच्या पालखीदरम्यान पाऊस येतोच हे वर्षानुवर्षाचे चित्र आहे. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाने दडीच मारली आहे. बहुतांश वारकरी हे शेतकरी असल्याने पेरणी आटोपून ते वारीत सहभागी होत असतात. या वर्षी मात्र वेगळी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. असे असले तरीही पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी ओढीने वारकरी उत्साहाने मार्गक्रमण करत आहेत.