होमपेज › Pune › कासारवाडीत महापालिका बांधणार इंग्रजी शाळेसाठी इमारत

कासारवाडीत महापालिका बांधणार इंग्रजी शाळेसाठी इमारत

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:05AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

कासारवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंग्रजी शाळेसाठी  इमारत बांधण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्याम लांडे यांनी केलेल्या  पाठपुराव्यास यश आले आहे. येत्या मंगळवारी होणार्‍या महापालिका स्थायी समिती सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. 

कासारवाडी-संत तुकारामनगर, प्रभाग क्र.  20 मध्ये पालिका शिक्षण मंडळ,आकांक्षा आणि थरमॅक्स फाउंडेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल या नावाने लोअर केजी ते इयत्ता दहावीपर्यंत शाळा चालवली जाते; मात्र शाळेस शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून वर्गखोल्या कमी पडत होत्या, त्यामुळे  श्याम लांडे यांनी या ठिकाणी श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम शाळेची सर्व सुविधांनी युक्त इमारत बांधावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी राज्यसभा खासदार चित्रपट अभिनेत्री रेखा गणेशन यांना पत्र पाठवून वर्गखोल्यांसाठी 2 कोटी रुपये निधी देण्याची विनंती केली होती. त्याचा आधार घेऊन लांडे यांनी नवीन इमारतीसाठी आग्रह धरला. 

महापालिका निवडणुकीनंतर लांडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. पालिकेने या इमारतीचे डिझाईन बनविण्यासाठी हर्षल कवडीकर यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी होणार्‍या स्थायीच्या सभेपुढे सदर इमारत बांधकामासाठी 13 कोटी 71 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय ठेवला आहे. सिटी सर्व्हे नं. 2365, सर्व्हे नं. 420 येथे ही शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. पार्किंग प्लस 5 मजल्यांची ही  इमारत असेल. त्यात 41 वर्गखोल्या, अपंगांसाठी रॅम्प व लिफ्ट सुविधा, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट, 1550 स्केअर मीटरचे प्ले ग्राऊंड, सीमाभिंत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आदी सुविधा असतील.