Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Pune › बिल्डरच्या खुनाचा कट उधळला

बिल्डरच्या खुनाचा कट उधळला

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:30AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड येथील बिल्डरच्या खुनाचा कट गुन्हे शाखेने उधळून लावला असून, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध महाराजानेच त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा येथील कुख्यात गुन्हेगाराला 20 लाख रुपयांना सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, महाराज आणि त्याचा नातेवाईक पसार झाले आहेत. 

अमोल संपत मदने (वय 32, रा. बनवडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उदयसिंह चव्हाण उर्फ महाराज व त्याचा नातेवाईक शंकर चव्हाण हे पसार झाले आहेत. त्यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित रामभाऊ लांडगे (वय 33, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

उदयसिंह चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध महाराज आहे. त्याचा चाकण भागात मोठा आश्रम आहे. त्याच्यावर यापूर्वी फसवणूक केल्याचेही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फिर्यादी  अमित लांडगे हे बिल्डर आहेत. त्यांची आणि उदयसिंह चव्हाण उर्फ महाराज याची एका व्यक्तीमुळे ओळख झाली होती. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये उदयसिंह चव्हाण याने फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. तसेच, अडचण असल्याचे सांगून आर.टी.जी.एसद्वारे 18 लाख आणि रोख 17 लाख रुपये घेतले.

तीन महिन्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, चव्हाण हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. दरम्यानच्या काळात जानेवारी 2018 मध्ये उदयसिंह चव्हाण उर्फ महाराज याने खुनाची सुपारी दिली असून, त्या व्यक्ती माहिती घेण्यासाठी येथे आल्या आहेत, अशी माहिती फिर्यादी यांनाच समजली. त्याबाबत त्यांनी खात्री केली. त्यावेळी त्यांना सुपारी दिल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती घेतली. त्यावेळी कराड येथील कुख्यात अमोल मदने याला सुपारी दिल्याचे समजले. पोलिसांनी मदने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, उदयसिंह चव्हाण याने त्याचा नातेवाईक शंकर चव्हाण याच्यामार्फत फिर्यादी यांना मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यापोटी त्यांनी 20 लाख रुपये देण्याचे ठरले होते. 

दरम्यान अमोल मदने हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर कराड येथे अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहेत. तर, सांगली येथील गँगस्टर सल्या-चेप्या याच्या खुनातील आरोपी होता. त्याची या गुन्ह्यात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे. 

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, कर्मचारी दिनेश गडांकुश, सिराज शेख, अस्लमखान पठाण, अजय खराडे, राजू केदारी, किरण पवार, किशोर वग्गू, अजित फरांदे, प्रसाद जंगिलवाड, चंद्रकांत महाजन, गणेश नरूटे यांच्या
 पथकाने केली.