Sat, Nov 17, 2018 12:21होमपेज › Pune › बिल्डर देवेंद्र शहांवर दोघांकडून गोळीबार, शहा गंभीर

बिल्डर देवेंद्र शहांवर दोघांकडून गोळीबार, शहा गंभीर

Published On: Jan 14 2018 12:42AM | Last Updated: Jan 14 2018 12:42AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नामांकित बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात शहा हे गंभीर जखमी झाले आहेत. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवरील गल्ली नंबर आठ येथे शहा यांच्या घराच्या नजीकच शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

शहा यांच्यावर या हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.  गोळीबाराची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

गोळीबार करणार्‍या दोन्ही दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. खंडणीच्या प्रकरणातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा संशय डेक्कन पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून, शहरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या वस्तीत घडलेल्या या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह पोलिस खात्यातील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना  सतर्कतेचे आदेश दिले आहेत.