Wed, Jul 24, 2019 13:01होमपेज › Pune › लाचखोर आरोग्य निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

लाचखोर आरोग्य निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकार्‍याला डॉक्टरकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ही कारवाई ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. 

मधुकर निवृत्ती पाटील (वय 53) आणि डॉ. संदीप जयराम धेंडे (वय 40) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे डॉक्टर असून, त्यांचे रुग्णालय आहे. त्यांच्या रुग्णालयाचा नोंदणी परवाना नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हे प्रकरण ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदार यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मधुकर पाटील आणि संदीप धेंडे या दोघांनी 10 हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारीची पडताळणी केली असता दोघांनी 10 हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी संदीप धेंडेच्या सांगण्यावरून मधुकर पाटीलला ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 020-26122134, 26132802 व 26050423 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.