Sat, Mar 23, 2019 18:45होमपेज › Pune › नाट्यगृहांच्या दुरुस्तीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक

नाट्यगृहांच्या दुरुस्तीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 1:06AMपिंपरी : पूनम पाटील

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृह दुरुस्तीमुळे बंद आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठोस पर्यायांचा विचार न करता एकाच वेळी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराची दीर्घकालीन दुरुस्ती का सुरू केली, असा सवाल सर्वांनाच पडला आहे.

शहरात प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी व पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदीर अशी सध्या चार नाट्यगृहं आहेत. प्राधिकरणात ग. दी. माडगुळकर नाट्यमंदिर हे पाचव नाट्यगृह पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परंतु असे असले तरी मागील सहा महिन्यांपासून पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर दुरुस्तीसाठी नुतनीकरणासाठी बंद असून फेर निविदा काढून आणखी तीन महिने ते नूतनीकरणासाठी बंदच राहणार आहे. या कामी नूतनीकरणाची मुदत उलटूून गेल्यानंतरही पुन्हा एकदा निविदा काढून या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे  पुढील तीन महिने तरी हे नाट्यगृह बंदच राहणार आहे. तसेच चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहही आता एक मे पासून दुरुस्तीसाठी सहा महिने बंद आहे. त्यामुळे महत्वाची दोन गर्दी खेचणारी नाट्यगृहे दुरुस्तीला काढल्याने शहरातील कलाप्रेमींना सांस्कृतिक ठणठणाटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका कलाकारांना बसत असून विविध स्पर्धांसाठी कदाचित त्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे कलाप्रेमीसह कलाक्षेत्रातून नाराजीचा सूर निघत आहे. 

दुरुस्तीमुळे नाट्यसंस्था व कलाकारांची नाकाबंदी

सध्या नाट्यगृहांची दुरुस्ती व नुतनीकरण सुरु असून कलाकारांना मात्र आपल्या कलाकृती सादर करण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. काहींना शहरात कार्यक्रमासाठी नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने परगावी कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रा. मोरे प्रेक्षागृह तसेच आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रम ठेवल्यास मिळणारा प्रेक्षकवर्ग इतर ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक नाट्यगृहामधे लाभत नाहीत. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह व पिंपळे गुरव मधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात प्रेक्षकच लाभत नसल्याची ओरड कलाकार करत आहेत. तसेच या दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांचा केवळ मोफत नाटकांकडेच ओढा असतो. पैसे खर्चून कोणी येत नाहीत. त्यामुळे स्थानिक कलाकारांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कलाकारांसहीत अनेक नाट्यनिर्मात्यांनी पुणे शहर व मुंबईची वाट धरली आहे. 

दुरुस्तीला असलेल्या दोन्ही नाट्यगृहांचा विषय सध्या भलताच चर्चेत आहे.  गेल्या काही दिवसात या नाट्यगृहांच्या बाबतीत काही ना काही नाट्यमय घडामोडी घडत असून वारंवार या नाट्यगृहांची दुरुस्तीचे काम का काढले जात आहे. तसेच शहरात इतर नाट्यगृह उपलब्ध नसतांना या दोघा नाट्यगृहांची दुरुस्ती एकाच वेळी करण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवाल सुजाण नागरीक करत आहेत.

शहरातील मुख्य नाट्यगृहच दुरुस्तीसाठी सहा महिने बंदच राहणार असून कदाचित यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नाट्यसंस्था, कलावंत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक व कलारसिकांची अशी चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे.