Wed, Nov 13, 2019 13:25होमपेज › Pune › ‘बीआरटी’ मार्गातील  मेट्रोचे पिलर तोडणार

‘बीआरटी’ मार्गातील  मेट्रोचे पिलर तोडणार

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी

दापोडी-निगडी या बीआरटीएस मार्गावर पिंपरी चौकात पुणे मेट्रोने पिलर उभे केले आहे. हे पिलर काढून टाकून खड्डे बुजवून बीआरटी मार्ग पूर्ववत केला जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडी अशी दुहेरी बीआरटी विकसित केली जात आहे. या बीआरटीचा मार्ग तब्बल 25 किलोमीटर आहे. या मार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, मोरवाडीतील फिनोलेक्स चौक, महाराष्ट्र बँक व शॉपींग मॉलसमोर पुणे मेट्रोने बीआरटी मार्गातच मेट्रोचे पिलर उभारण्यास सुरुवात केली आहे. 

या संदर्भातील सर्वांत प्रथम वृत्त ‘पुढारी’ने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. मेट्रोला तंबी देऊन त्वरीत काम थांबविण्याचा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या. मात्र, बीआरटी मार्गात काम करण्यास पालिकेनेचे मान्यता दिल्याचे पुणे मेट्रोने स्पष्ट केले. 

आयुक्त हर्डीकर यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन बीआरटी मार्गावर उभारलेल्या पिलर व खोदाई कामाच्री पाहणी केली. हे काम थांबविण्याचा सक्त सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना दिल्या. तेव्हापासून या ठिकाणचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र, पिलर, फाउंडेशन व खड्डे अद्याप तसेच आहेत. 
या संदर्भात आयुक्तांना विचारले असता ते बोलत होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, मेट्रोने सदर ठिकाणचे काम थांबविले आहे. उभारण्यात आलेले पिलर काढून घेण्यात येणार आहे. खड्डे बुजवून बॅरिकेट पूर्ववत लावले जातील. तसा सुचना पुणे मेट्रोच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 

या संदर्भात मेट्रोचे प्रकल्प मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले की, आयुक्त हर्डीकर व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सदर कामाची पाहणी केली आहे.  आयुक्ताच्या सुचनेवरून सदर काम थांबविण्यात आले आहे. बीआरटी मार्गावरील बॅरिकेटच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यावर पिलर उभाण्याबाबत चाचपणी केली जात आहे. त्या संदर्भात नव्याने आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. आराखडा तयार झाल्यानंतर त्या पद्धतीने बीआरटी मार्गाच्या बाहेरून काम केले जाईल.