होमपेज › Pune › ब्राह्मण महासंघ - संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची

ब्राह्मण महासंघ - संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:29AMपुणे : प्रतिनिधी 

महापालिका भवनासमोरील चौथर्‍यावर दादोजी कोंडदेव यांच्या तैलचित्राच्या अनावरणावरून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोंडदेव यांचे तैलचित्र पालिकेसमोरून दुसरीकडे हालविले. दरम्यान, पालिका परिसर कोणाची खासगी मालमत्ता नाही. कोणी अनधिकृतपणे असे प्रकार करत असेल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी दादोजी कोंडदेव यांचे तैलचित्र पालिका भवनासमोर तयार केलेल्या चौथर्‍यावर ठेवून पूजन केले. ही घटना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी पालिकेकडे धाव घेऊन, ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. यावेळी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू  झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली. शेवटी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दादोजी कोंडदेव यांचे तैलचित्र चौथर्‍यावरून काढून नेल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. 

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला होता. लाल महालातील पुतळा हटवल्यानंतर पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसविण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली होती. निवडणुकीच्यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे बसविण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. मनपा अधिकार्‍यांना जाग आणण्यासाठी दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीदिनी पालिका आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले.  सामान्य नागरिकांना पालिकेत प्रवेश देताना सुरक्षा रक्षकांकडून विचारपूस करून त्याला गेटपास देऊन आत सोडले जाते.

पालिकेच्या आवारात कोणतीही कृती करत असताना पालिका आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे; मात्र ब्राह्मण महासंघाने पालिकेची कोणतीही परवानगी न घेता पालिकेच्या समोरील चौथर्‍यावर दादोजी कोंडदेव यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. खरे तर महापालिका प्रशासन आमदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या दबावाखाली काम करीत आहे. म्हणूनच सुरक्षा रक्षकांनी एवढे मोठे तैलचित्र आतमध्ये आणताना आणि त्याचे अनावरण करताना बघ्याची भूमिका घेतली. पालिका आयुक्तांनी बेकायदेशीर कृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिला आहे. 

सत्ताधार्‍यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करावा : राष्ट्रवादी 

महापालिका प्रांगणात बेकायदेशीरपणे तैलचित्राचे अनावरण करण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करीत असून, सत्ताधारी भाजपने लोकशाही मार्गाने पालिका सभागृहात प्रस्ताव मांडावा. त्यावर आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करू, ज्यांना बाजूने मतदान करायचे आहे, ते करतील. मग त्यांनी कोणाचा पुतळा कोठे लावायचा, तैलचित्र अनावरण करायचे आहे ते करावे. अनधिकृतपणे कृत्य करून समाजातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना कळेल त्या मार्गाने चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिला आहे.  

एखाद्या नेत्याचे मत ही पक्षाची भूमिका नसते : भाजप

दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा बसविण्याचे आश्‍वासन भाजपने निवडणुकीपूर्वी प्रचारात दिलेले नाही. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्येही तसे आश्‍वासन नाही. आमच्या पक्षातील कोणी नेता व्यक्तिगत मत मांडत असेल, तर ती पक्षाची भूमिका होत नाही. व्यक्तिगत भूमिकेपेक्षा पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले. दरम्यान, शहराध्यक्षांनी पक्षाची भूमिका जाहीर करून कोथरूडच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी कोंडदेव आणि गडकरी यांचे पुतळे पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी बसविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांची हवाच काढून घेतली आहे.