होमपेज › Pune › अतिरिक्‍त आयुक्‍तांची दोन्ही पदे रिक्त

अतिरिक्‍त आयुक्‍तांची दोन्ही पदे रिक्त

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:20PMपिंपरी : प्रतिनिधी

पालिकेला राज्य सेवेतील अतिरिक्त आयुक्त अद्याप मिळायला तयार नाही. पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. यामुळे  शहरातील विकासकामांवर परिणाम होत आहे; तसेच प्रशासकीय कामकाजाला विलंब होत आहे. राज्य सरकारकडून अतिरिक्त आयुक्त आणण्याबाबत सत्ताधारी उदासीन आहेत. सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यापासून पालिकेत येण्यास कोणी अधिकारी राजीही नाहीत;   तसेच पालिका सेवेतील अधिकार्‍यांमधून भरावयाचे अतिरिक्‍त आयुक्तपद देखील रिक्त आहे. त्यामुळे सगळा आनंदी आनंद आहे

महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर पालिकेचे तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली.  परंतु, हांगे यांची केवळ चार महिन्यातच  बदली झाली. 1 जून  2017  रोजी पिंपरी पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर ते रुजू झाले  अन् 25 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांची तडकाफडकी बदली झाली. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाखांच्या वर गेली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, शहर विकासाला गती देण्यासाठी पालिकेत आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्तपद हे महत्त्वाचे पद आहे. महापालिकेचा 2014 मध्ये ‘ब’ वर्गामध्ये समावेश झाला. त्यामुळे पालिकेत राज्य सेवेतील एक आणि पालिका अधिकार्‍यांमधून एक असे दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. परंतु, ही दोन्ही पदे रिक्त आहेत.

आयुक्‍तांकडे स्मार्ट सिटीचे सीईओपद

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देखील तात्पुरत्या स्वरूपात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयुक्‍तांना पालिका आणि स्मार्ट सिटीचे काम बघावे लागत असल्याने कामाला वेग येत नाही.