होमपेज › Pune › कर्जदार शेतकरी हैराण

कर्जदार शेतकरी हैराण

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:25AMभामा आसखेड : वार्ताहर

कोये (ता. खेड) येथील विकास सोसायटीचे कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा सरसकट झालेला नाही. त्यामुळे कर्जधारक शेतकरी हैराण झाले आहेत. जून 2017 पर्यंत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

विकास सोसायटीचे कर्ज जूननंतर भरल्यास वर्षभराचे व्याज आकारण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी उसनवारी करून वेळेत कर्ज भरतात. कर्ज नियमित आणि वेळेत भरणार्‍या शेतकरी सरासरी 70 टक्के आहेत. उर्वरित शेतकरी थकबाकीदार असतात. काही शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांसाठी कर्ज घेऊन त्याची वेळेत फेड करतात. 
कर्जमाफीची घोषणा झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी मार्च व जूनअखेर कर्ज भरले नाही, त्यामुळे अनेक नियमित कर्ज भरणारे शेतकरी थकबाकीदार झाले. वेळेत कर्ज भरले नाही म्हणून त्यांच्या कर्जावर वर्षभराचे व्याज आकारण्यात आले. 

परिणामी शेतकरी आणखीनच अडचणीत आला. शासनाने 30 जून 2016 अखेर कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी केल्याने त्यानंतर कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. परिणामी शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 30 जून 2017 ते आजखेरपर्यंत कर्ज घेतलेल्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी करावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. 

कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाच्या 25 टक्के प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. दीड लाख रुपये कर्जमाफीस अगदी काही शेतकरी पात्र ठरले. 

काही शेतकरी 25 टक्के कर्जमाफीस पात्र ठरले, परंतु सरसकट कर्जमाफी नसल्याने आणि अतिशय किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी वैतागले आहेत.कोये सोसायटीकडून 3 ऑगस्ट 2016 रोजी 2 लाख 96 हजार रुपये कर्ज घेतलेले धामणे येथील वृद्ध शेतकरी गेनभाऊ विठोबा भोकसे याबाबत म्हणाले की, कर्जमाफी होणार म्हणून आम्ही कर्ज भरले नाही. आता घोषणा केल्याप्रामाणे शासनाने दीड लाख रुपये माफ करावेत, उर्वरित कर्ज भरण्यास आम्ही तयार आहोत. 

कर्जमाफीमुळे अनेकांनी कर्ज भरले नसल्याने अनेक शेतकरी थकबाकीदार राहिले आहेत. तत्काळ सरसकट दीड लाख रुपये माफ करावेत, नाहीतर फसव्या घोषणेचा काहीच उपयोग होणार नाही.