होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’ बोर्‍हाडेवाडी प्रकल्प फेरनिविदा संशयास्पद

‘पंतप्रधान आवास’ बोर्‍हाडेवाडी प्रकल्प फेरनिविदा संशयास्पद

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:58AMपिंपरी : प्रतिनिधी

बोर्‍हाडेवाडी, मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या गृहप्रकल्प योजनेची निविदा 10 दिवस एवढ्या अल्प मुदतीत मागविण्याचा निर्णय घेतल्यामुळे, या निविदेविषयी  संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्यामुळे या प्रकरणात कोट्यवधींची टक्केवारी खाण्यासाठी आयुक्‍तांनी अल्प मुदतीची निविदा काढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

या कामासाठी पहिल्या निविदेसाठी 28 दिवसांची मुदत देण्यात आली होती. बोर्‍हाडेवाडी प्रकल्पासाठी मनीषा काँट्रॅक्टर, बी. जी. शिर्के आणि एच. जी. काँट्रॅक्टर यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांपैकी एक ठेकेदार बाद झाल्यामुळे आणि उर्वरित ठेकेदारांचा देकार निर्धारित किमतीपेक्षा अधिक जास्त असल्यामुळे या कामासाठी  दुसर्‍यांदा निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी आयुक्तांनी 10 दिवस इतक्या अल्प मुदतीची निविदा मागविली आहे. एकूण 110 कोटी 13 लाख 70 हजार 772 रुपयांची ही निविदा असून, ठेकेदाराने हे काम 30 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे.

इतक्या मोठ्या योजनेसाठी 10 दिवसांची निविदा मुदत ठेवण्याची आयुक्तांची घाई नक्की कशासाठी? केवळ अध्यक्षा  सावळे यांचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्यामुळेच आयुक्तांनी हा खटाटोप केला आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.

सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत.  शहराचे व महापालिकेचे हित न पाहता केवळ पदाधिकार्‍यांना खूष करण्यासाठी हा खटाटोप केला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची निविदा रद्द करून निविदा भरण्यासाठी पुरेसा कालावधी देऊन पुन्हा फेरनिविदा मागविण्यात याव्यात, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.