Sat, Jul 20, 2019 15:04होमपेज › Pune › बोपखेलकरांसाठी तो दिवस ठरला काळा

बोपखेलकरांसाठी तो दिवस ठरला काळा

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 12:59AMपुणे : नरेंद्र साठे  

बोपखेलकरांसाठी तीन वर्षांपूर्वी आलेली सकाळ आजही डोळ्यांसमोरून जात नाही. कारणही तसेच आहे. बोपखेलकरांचा हक्काचा रस्ता बंद केल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांचे होत असलेले हाल पाहून रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी नागरिक जनता दरबारात सहभागी झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तीन वर्षांपूर्वीचा गुरुवार 21 मे 2015 हा दिवस बोपखेलकरांसाठी काळा दिवस ठरला. त्या हिसंक घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली.  मात्र, ना जिल्हा प्रशासन हलले, ना महापालिका प्रशासन हलले. त्यामुळे आजही बोपखेलकरांना रस्त्यासाठी 18 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो.

दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) हद्दीतील बोपखेलसाठी जाणारा रस्ता दि. 12 मे 2015 बंद करण्यात आला. हक्काच्या रस्ता बंद झाल्याने बोपखेलकरांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले. मुलांच्या शाळा बदलण्याची वेळ आली. त्यामुळे रस्ता पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी गुरुवार दि.21 मे 2015 रोजी नागरिकांनी जनता दरबार आंदोलन केले. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक जण जखमी झाले, तर जखमी झालेल्या एका पोलिसाचा काही महिन्यांनंतर मृत्यू झाला होता. रस्ता बंद झाल्याने बोपखेलकरांचे जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या मागणीसाठी सर्व खासदार आणि स्थानिक नगरसेवकांनी संरक्षण खात्याकडे पाठपुरवा करण्यास सुरुवात केली होती.

नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून लष्कराकडून मुळा नदीवर खडकीच्या बाजूला तरगंता पूल महिन्याने सुरू केला. लष्कराचे अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांच्यामध्ये रस्त्याच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या. प्रकरण न्यायालय प्रविष्ट असल्याने तारखा सुरू होत्या. न्यायलयाने जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना रस्त्यासाठी पर्यायी रस्ता शोधण्याचे आदेश दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी तीन रस्त्यांचे पर्याय ठेवले होते. त्यामध्ये सध्या बंद केलेल्या रस्त्याच्या बाजूने उंच सीमाभिंत बांधणे, सीएमईच्या आणि मुळा नदीच्याकडेने नवीन रस्ता तयार करणे आणि खडकीच्या बाजूने अ‍ॅम्युनेशन फॅ क्टरीकडे निघण्यासाठी नदीवर पूल उभारावा आणि खडकीतील गवळीवाडा येथे मुख्य रस्त्याला जोड द्यावा. त्यातील तिसरा पर्याय मान्य करून त्यावर या तीन वर्षांत विविध पातळीवर खलबते सुरू आहेत.

बोपखेलकरांना हवा आहे तात्पुरता पूल

मुळा नदीवर महापालिका बांधणार असणार्‍या पक्या पुलासाठी मोठा अवधी जाणार असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी गेल्या एक वर्षापासून किमान तात्पुरता पूल द्यावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. गावातील नागरिकांनी यासाठी उपोषण केले, विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्रे लिहिली, परंतु बोपखेलकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ना प्रशानसाला वेळ आहे, ना राजकीय नेते मंडळींना. तात्पुरत्या पुलासाठी गावकर्‍यांनी तीन उपोषणेदेखील केली मात्र, त्याचा प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही.