Sun, May 19, 2019 22:32होमपेज › Pune › रस्त्यासाठी बोपखेलकरांचा नवा पर्याय

रस्त्यासाठी बोपखेलकरांचा नवा पर्याय

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:56PMपुणे : बोपखेल गावचा तीन वर्षापूर्वी रस्ता बंद झाला. तेव्हापासून आज पर्यंत या रस्त्यासाठी ग्रामस्थ विविध पातळीवर संघर्ष करत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. गावकर्‍यांनी इतर पर्याय देऊन देखील त्याचा लष्काराची हद्द असल्याने विचार केला गेला नाही, म्हणून गावकर्‍यांनी आता खासगी कंपनीच्या जागेतून दिघी-भोसरी रस्त्याला जाणार्‍या रस्त्याचा पर्याय जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात सुचवला आहे.

बोपखेलमधून दापोडीला सीएमईतून जाणारा रस्ता बंद केल्यापासून गावकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. त्यावर बोपखेल गावात, पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे केली. पण त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. गावकर्‍यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी पक्का पुल होई पर्यंत, मुळा नदीवर तात्पुरता पुल टाकून खडकीला रस्ता जोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीचा प्रशासकीय पातळीवर कोणताच विचार झाला नाही. मुळा नदीवरील पक्क्या पुलाच्या प्रस्तावाची फाईल पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिल्लीला पाठवली आहे. मात्र, त्या फाईलचे पुढे काय झाले, यासंदर्भातही कुणाकडेच काही माहिती नसल्याचे बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी संघर्ष समितीचे संतोष घुले, गुलाब भालेराव, दिगंबर गायकवाड, श्रीकांत घुले, रवी कोवे आदी यावेळी उपस्थित होते.