Tue, Jul 16, 2019 10:23होमपेज › Pune › बोपखेलकरांनी वळवला आता मंत्रालयाकडे मोर्चा

बोपखेलकरांनी वळवला आता मंत्रालयाकडे मोर्चा

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:30AM

बुकमार्क करा
पिंपरी : नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात अडीच वर्षे हेलपाटे मारून हाती काहीच न आल्यानंतर, बोपखेलकरांनी आता मंत्रालयाकडे मोर्चा वळवला आहे. तात्पुरत्या पुलाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय गावकर्‍यांनी गावात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ देखील मागितली असून, गावकर्‍यांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाणार असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या उदासीनतेचा बोपखेलकरांना आलेला  अनुभव या शिष्टमंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी ठराविक राजकीय नेतेमंडळींच्या इशार्‍यावर पुढचे पाऊल उचलत नसल्याचा आरोप गावकरी करतात. आयुक्तांना काम करत असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यांचे अधिकारी गावकर्‍यांनी सुचवलेल्या पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी देखील येत नाहीत. 

गावकरी महापालिकेत आले की, आयुक्तांना भेटतात, त्यांच्यापुढे गार्‍हाणे मांडतात. आयुक्त संबंधित अधिकार्‍यांना फोन करतात. अधिकारी लवकर भेटण्याचे सांगतात. आयुक्त गावकर्‍यांना गावात अधिकारी भेट देणार असल्याचे सांगून बोळवण करतात; परंतु आयुक्तांना दिलेला शब्द देखील संबंधित विभागाचे अधिकारी पाळत नसून, बोपखेलकर संबंधित अधिकार्‍याला भेटायला गेले, तर केबीनमध्ये नसल्याचा निरोप बाहेर ठेवला जातो. या सर्व प्रकारामुळे बोपखेलकर त्रस्त झाले असून, अधिकार्‍यांना दाखवण्यासाठी दोन जागा सुचवून देखील अधिकारी कुठलेच पाऊल उचलत नाहीत. या सर्वाला कंटाळून बोपखेलकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बोपखेलचा रस्ता बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि एकूणच सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. यासंदर्भात बोपखेलकरांनी गावात, महापालिकेजवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणे केली आहेत; परंतु त्यातून हाती काहीच आले नाही. नदीपात्रात जी मोकळी जागा आहे, त्यातून गावकर्‍यांना दापोडीकडे येण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करावा किंवा खडकीतील महादेववाडी भागात देखील रस्ता काढता येऊ शकतो, असे पर्याय महापालिकेच्या अधिकार्‍यांना गावकर्‍यांनी सुचवले होते; परंतु अधिकार्‍यांनी ठिकाणावर येऊन पाहण्याची देखील तसदी घेतली नसल्याचा आरोप बोपखेलकर करत आहेत.