Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Pune › विमाकवच ठरणार अनाथ विद्यार्थ्यांसाठी ‘बूस्टर’

विमाकवच ठरणार अनाथ विद्यार्थ्यांसाठी ‘बूस्टर’

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी 

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनाथ म्हणून ‘सरस्वती’पासून कोसो दूर जाव्या लागणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या विमा संरक्षण योजनेतून नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच, पोटचा आधार हरपल्यास त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही विमा कंपनीच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळेल, अशा शब्दांत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेल्या घोषणेचे विद्येच्या माहेरघरात स्वागत करण्यात आले. 

राज्यातील दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवून, त्याचे संरक्षण विद्यार्थ्यांसह पालकांना देण्याची घोषणा तावडे यांनी रविवारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूल (ता. गडहिंग्लज) येथील ‘इंदिरादेवी जाधव आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज’च्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी केली होती. आई अथवा वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षणाचा आर्थिक भार पेलत नसल्याने राज्यातील अनेक मुलांचे शिक्षणच बंद होते. विद्यार्थ्यांवर अशी परिस्थिती ओढवू नये, म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे अकाली अनाथपणाचा आघात सहन करावा लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय ‘बूस्टर’ ठरणार आहे. राज्यातील विद्यार्थी-पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनीही या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.