होमपेज › Pune › बोगीला इंजिनची धडक

बोगीला इंजिनची धडक

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:41AMलोणावळा : वार्ताहर

खंडाळा रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे गेट क्रमांक 29 जवळ ‘डाऊन लाईन’वर कुर्ला लोकमान्य    टिळक टर्मिनसहून मदुराईच्या दिशेने जाणार्‍या मदुराई एक्स्प्रेस या गाडीला शुक्रवारी पहाटे अपघात झाला. या एक्सप्रेसच्या मागील बाजूस जोडण्यात आलेले बंकर इंजिन गाडीच्या शेवटच्या बोगीमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊन, पुणे- मुंबई दरम्यान धावणार्‍या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.

खंडाळा घाट चढून जाण्यासाठी या गाडीला मागील बाजूस जोडण्यात आलेल्या बंकर इंजिनचा जास्तीचा रेटा बसून हे इंजिन गाडीच्या शेवटच्या बोगीत घुसले. यामुळे या बोगीचे नुकसान झाले; मात्र सुदैवाने ही बोगी सामान ठेवण्याची असल्याने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघाताची खबर मिळताच लोणावळा पोलिस, रेल्वेचे कर्मचारी, पोलिस दल आणि बचावपथक घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. पहाटे साडेचारच्या सुमारास अपघातग्रस्त बोगी गाडीपासून वेगळी करून, या एक्स्प्रेसला पुढे मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त बोगी तसेच बंकर इंजिन बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या ‘डाऊन लाईन’वरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला.घाटात डाऊन लाईन, अप लाईन आणि मिडल लाईन अशा एकूण तीन रेल्वे लाईन असल्याने ‘डाऊन लाईन’ बंद करून ‘मिडल लाईन’ने रेल्वेची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला तरी सकाळच्या वेळेत प्रवाशांचे हाल झाले.