होमपेज › Pune › ब्ल्यू व्हेलनंतर आता पालकांना मोमो चॅलेंजची धास्ती

ब्ल्यू व्हेलनंतर आता पालकांना मोमो चॅलेंजची धास्ती

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:50PMपिंपरी : पूनम पाटील

मागील वर्षी ब्लू व्हेल नावाच्या गेमने लहान मुलांचे बळी घेतल्यानंतर, आता एक नवा जीवघेणा सोशल मीडिया गेम जगभरात धुमाकूळ घालतोय, ज्याचं नाव आहे ‘व्हॉट्सअ‍ॅप मोमो चॅलेंज’ हा गेमही मुलांसाठी जीवघेणा ठरत असून, पालकांनी स्वतःची व विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन आता सोशल मीडियावरूनच केली जातेय. या ‘मोमो’ चॅलेंजमुळे शहरातील पालक चिंतेत असून मुलांना मोमो चॅलेंजपासून कसे दूर ठेवावे, या भीतीने पालकांना ग्रासले आहे. 

लॅटिन अमेरिकेसह विविध भागात हा गेम लहान मुलांना टारगेट करत असून शहरातील पालकांना मुलांची चिंता सतावते आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर हा नंबर शेअर केला की, धडकी भरवणारा चेहरा समोर येतो आणि सुरू होतो जीवघेणा खेळ. हा नंबर सेव्ह केल्यानंतर अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात, ज्यामुळे मुले आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. मोमो गेमचा हा क्रमांक जपानचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय, तसेच त्यातील चेहरा हा जपानमधील  संग्रहालयात ठेवलेल्या एका पुतळ्यासारखा असल्यासारखा बोलले जातेय. 

फेसबुकवर सर्वप्रथम हा गेम पाहिला गेला. या गेमपासून सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शक्यतो, ‘सिंगल सिबलींग’ (एकुलते एक) असलेली मुले या गेमच्या जाळ्यात अडकत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. राजस्थानमध्ये नुकताच यात एकाचा बळी गेल्याचे वृत्त आहे. याचा धसका पालकांनी घेतला असून, आपल्या मुलांना या गेमपासून दूर ठेवण्यासाठी काय करावे लागेल, या विवंचनेत शहरातील पालक आहेत. 

मुलांना पुरेसा वेळ द्यावा

पालकांनी मुलांना दररोज थोडा वेळ द्यावा. परंतु पालक केवळ शनिवार, रविवार मूल जे म्हणेल ते करतात. याचा चुकीचा परिणाम म्हणजे मुले ही ‘डिपेन्डींग’ व ‘डिमांडींग’ होतात. आपण मागू ते मिळतेच या भावनेने हट्टी बनतात. मुलांना जे गॅझेट किंवा अ‍ॅप देतात, त्याची परिपूर्ण माहिती पालकांना असायला हवी. तसेच पॅरेन्टल कन्ट्रोल ठेवल्यास मुले स्थिरावतील.  मी काय करू? असा प्रश्‍न मुलांनी विचारला तर पालकांनी त्याच्यासाठी एक सकारात्मक व पर्याय शोधायला हवा, तसेच  पालकांना मुलांच्या बाबतीत मोमो गेमची भीती वाटत असल्याने त्यांनी एक ग्रुप करून सायबर सेलची मदत घेणे गरजेचे आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.