होमपेज › Pune › अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप

अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 12:55AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

कृष्णा सुब्रमण्यम स्वामी (25, संतनगर, वाघोली रोड, लोहगाव) आणि गणेश सुनील जगताप (24, रा. लोहगाव) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ज्ञानेश्वर महादेव हरगुडे (56, रा. खेसे कॉलनी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

दि. 22 जून  ते 23 जून 2013 दरम्यान हा प्रकार कलवड वस्ती येथील मोकळ्या मैदानावर लोहगाव येथे घडला. आरोपींचा मित्र राकेश कांबळे याच्या पत्नीचे राकेश ज्ञानेश्वर हरगुडे याच्याशी प्रेमसंबंध होते. हेे प्रेमसंबंध कायमचे दूर करण्यासाठी कृष्णा स्वामी आणि गणेश जगताप यांनी कट रचून धारदार कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह इंडिका कारमध्ये घालून तो धानोरी रोड येथील डे्रेनेजच्या टाकीमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दोघांना अटक होऊन त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात सरकारी वकील विलास पटारे यांनी 15 साक्षीदार तपासताना दोघा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.

आरोपीच्या कपड्यावरील रक्‍ताचे डाग आणि मृताच्या रक्‍ताचे नमुने, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यात विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी गुन्ह्याचा तपास केला. चौकशी अधिकारी म्हणून सहा. फौजदार एस. एन. बोंगाळे यांनी काम पाहिले. तर, पोलिस शिपाई जगताप यांनी कोर्टकामी मदत केली.