Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Pune › रक्तपेढ्या, औषध उत्पादन कंपन्यांचे परवाने रद्द

रक्तपेढ्या, औषध उत्पादन कंपन्यांचे परवाने रद्द

Published On: May 04 2018 2:00AM | Last Updated: May 04 2018 1:54AMपुणे : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुणे विभागातील अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, कॉस्मेटिक्स या औषध उत्पादक करणार्‍या कंपन्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये रक्तपेढ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने एफडीएने 23 औषध उत्पादकांसह, 32 रक्तपेढ्या अशा 55 ठिकाणी निलंबनाची कारवाई केली आहे, तर 13 औषध उत्पादकांसह रक्तपेढ्यांचे परवाने कायमचेच रद्द केले आहेत.

पुणे विभागात एफडीएच्यावतीने अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, कॉस्मेटिक्स, रक्तपेढ्या तसेच रक्त साठवणूक केंद्रांविरोधात कारवाई केली आहे. एफडीएच्या अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे  पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एफडीएकडून एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अ‍ॅलोपॅथीच्या 18 औषध उत्पादकांचे परवाने निलंबित तर चौघांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. होमिओपॅथीचे दोन तर कॉस्मेटिक्सचे तीन परवाने निलंबित केले आहेत. रक्तपेढ्यांमध्ये 22 परवाने निलंबित तर तीन रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 10 रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित तर 6 जणांचे परवाने रद्द केले आहेत.

एफडीएच्या विविध तरतुदीचे उल्लंघन केल्याने या कारवाया करण्यात आल्या आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 1945 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याने कॉस्मेटिक्स उत्पादकांवर तर शेड्यूल एफ 12 (ब) मधील कायद्याचे उल्लंघन केल्याने रक्तपेढ्यांचे परवाने रद्द अथवा निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील अ‍ॅलोपॅथीच्या 9 कंपन्यांचे परवाने निलंबित केले असून 3 परवाने रद्द केले आहेत. कॉस्मेटिक्सचे 3 आणि होमिओपॅथीचे दोन परवाने निलंबित केले आहेत.  प्रत्येकी सहा रक्तपेढ्यांसह रक्तसाठवणूक केंद्राचा परवाना निलंबित केला असून चार रक्त साठवणूक केंद्राचे परवाने रद्द केले आहेत. पुणे जिल्ह्यात 26 उत्पादकांचे परवाने निलंबित करताना 7 परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.