होमपेज › Pune › मैत्रीने दिली नवसंजीवनी

मैत्रीने दिली नवसंजीवनी

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 05 2018 12:08AMपुणे : नरेंद्र साठे

नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी एवढीच काय त्या दोघांची ओळख... ‘ती’ त्याचवेळी ब्लड कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करत होती. ‘ती’ आजाराने हतबल झालेली, त्यातच ‘तो’ भेटला अन् मुक्ताची जगण्याची उमेद वाढली. पण, हे नियतीला मान्य नव्हतं. केवळ चार महिन्यांच्याच ओळखीमध्ये ‘ती’ कायमची ‘मुक्त’ झाली. त्यानंतर ध्येयवेड्या मित्राने तिच्या स्मृती जागवण्यासाठी मुक्ता ब्लड लाईन करण्याचा निर्धार केला. सचिन आशा सुभाष सोेलापूरच्या नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी, तर उत्तराखंडमधील ताडीखेतमधील नवोदय विद्यालयाची मुक्ता माजी विद्यार्थ्यीनी होती. 

नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संघटना आहे. सचिन त्याच्या संस्थेच्या कामानिमित्त दिल्लीला निघाला होता. त्याचवेळी मुक्ता ही दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये ब्लड कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समजली. सचिन दिल्लीत पोचल्यानंतर मुक्ताला भेटला. सचिनची आणि मुक्ताची ती पहिलीच भेट. ती थोडी लाजत होती, कारण केमोमुळे तिचे केस काढलेले होते. दुसर्‍यादिवशी तिला भेटायला जाताना मी देखील केस काढून गेलो, तर तिला आपलं दु:ख वाटून घेतोय, याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसून येत होतं. तिला मी पुस्तक आणि तिच्या आवडत्या कविता वाचून दाखवायचो. 

मैत्रीदिनानिमित्त मुक्तासोबतच्या मैत्रीबद्दल सचिन बोलताना गहिवरून म्हटला, तिची अन् माझी काही जास्त ओळख नव्हती. मी दिल्लीत होतो तोपर्यंत ती मेडीटेशन, फिरणे निय8*मित सुरू होते. मी पुन्हा पुण्याला परतल्यानंतर तिची तब्बेत पुन्हा खालावली. मुक्ताच्या उपचारासाठी माजी विद्यार्थ्यांकडूनच बाहेर देशात देखील प्रयत्न केले गेले. शेवटच्या काही दिवसांमध्ये मुक्ता तीन दिवस बाहेर न आल्याने तिच्या आईवडिलांच्या आग्रहामुळे मला पुन्हा दिल्लीला जावे लागले. मुक्ताशी खोटे बोलून तिला मी बाहेर फिरायला सुद्धा गेलो होतो. 

मुक्ता म्हणायची काहितरी सामाजिक काम कर.त्यानुसार सचिनने मुक्ता ब्लड लाईन नावाची रुग्णांना रक्त पुरवण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निश्‍चय केला आहे. त्यासाठी सचिन झपाटून काम करत आहे. यामुळे मुक्ता ब्लड लाईन असे मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. त्याद्वारे रक्त आवश्यक असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या रक्तदात्यापर्यंत संदेश या अ‍ॅपद्वारे पोचवण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून गरजू लोकांना रक्तही मिळेल आणि आम्हाला मुक्ताची मैत्री कायम ठेवता येईल, असे सचिन सांगतो.