होमपेज › Pune › जानेवारी २०१९ पर्यंत मिळणार ब्लॉक लेव्हल अंदाज 

जानेवारी २०१९ पर्यंत मिळणार ब्लॉक लेव्हल अंदाज 

Published On: Jan 08 2018 7:27PM | Last Updated: Jan 08 2018 7:26PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी

देशातील शास्त्रज्ञ उत्तम काम करत असून सामान्यांपर्यंत माहिती पुरविण्याचे मोलाचे कार्य ते बजावत आहेत. 1999 मध्ये ओडिशामध्ये आलेले चक्रीवादळ असो की नुकतेच आलेले ओखी चक्रीवादळ असो, शास्त्रज्ञांनी याचे अंदाज 2-3 दिवस आधीच वर्तविले होते. एवढा अचूक अंदाज वर्तविण्यामागे शास्त्रज्ञांचा सखोल अभ्यास आहे. जानेवारी 2019 पर्यंत आपल्याला दर 12 किलोमीटरपर्यंतचा हवामानाचा अंदाज (ब्लॉक लेव्हल) वर्तविणे सहज शक्य होणार असून याचा सर्वाधिक फायदा शेतकर्‍यांना होणार आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. 

भारतातील पहिल्या मल्टी पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरचे (प्रत्युष) उद्घाटन आयआयटीएम, पाषाण येथे हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, आयआयटीएमचे संचालक रवीन अंजुम दया, सचिव एम. राजीवन, बिपीन चंद्रा, आदी उपस्थित होते. सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन होणे ही केवळ पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट नसून संपूर्ण भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे.

यासाठी तब्बल 450 कोटी रुपये खर्च झाला असून भविष्यात हवामानातील अचूक अंदाज वर्तविण्यात या सुपर कॉम्प्युटरचा उपयोग होणार आहे. सुनामीचा अंदाज देण्यात भारत सर्वात पुढे आहे. गेल्या काही वर्षात चक्रीवादळ, सुनामी, भुकंप या नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या मृत्यूत लक्षणीय घट झाली असून अचूक अंदाज वर्तविल्यामुळेच ते शक्य झाले आहे. याचे श्रेय शास्त्रज्ञांनाच जाते. कोट्यवधी शेतकर्‍यांपर्यंत चुटकीसरशी स्थानिक हवामानात होणार्‍या बदलांविषयी माहिती पोहोचत असून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सहज शक्य होत असल्याचेही वर्धन यांनी सांगितले. 

2022 पर्यंत नवीन भारत उदयास आलेला दिसून येणार असून हवामानाचा अंदाज अचूक वर्तविण्यात भारत तिसर्‍या स्थानी झेप घेईल, असा मला विश्‍वास वाटतो. 2018 वर्ष हे संशोधनासाठी सर्वोत्तम असून नॅशनल मान्सून मिशन, अर्ली सुनामी सिस्टिम, लढाऊ विमाने, आदी गोष्टी या वर्षभरात होणार आहेत. समुद्रात महिनोनमहिने राहून शास्त्रज्ञ सामान्य माणसांसाठी व मच्छीमारांसाठी माहिती पुरवण्याचे मोलाचे काम करतात. याचे करावे तेवढे कौतुक कमी असून याच दिशेने भारताची घौडदौड सुरू राहिल्यास भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असेही वर्धन म्हणाले.