Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Pune › रसायन घेऊन जाणारा ट्रक भस्मसात !

रसायन घेऊन जाणारा ट्रक भस्मसात !

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 1:14AMलोणी काळभोर : प्रतिनिधी 

सॉल्हंट या रसायन बॅरलची वाहतूक करणारा ट्रक कवडी पाट टोल नाक्यावर दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाला. अपघातानंतर या ट्रकमधील रसायनाने पेट घेतल्याने ट्रक भस्मसात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसुन ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. ही घटना बुधवारी (दि. 4) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीमधुन ट्रकचालक रामदास धोंडीबा सोनवणे (वय 25, रा. वरवंड, ता. दौंड)हा सहा चाकी ट्रकमध्ये (एमएच12 एफसी  6814) 180 लीटरचे 55 बॅरल भरून अंबरनाथ (कल्याण) येथे निघाला होता. पुणे-सोलापूर महामार्गाराने पुण्याच्या दिशेने जात असताना लोणी काळभोरजवळील कवडी पाट टोल नाका येथे एक मारुती कार या ट्रकसमोरून ओव्हरटेकच्या नादात ट्रकला आडवा गेला. या वेळी चालकाची नजर चुकल्याने टोल नाक्यावरील दुभाजकाला ट्रक आदळून अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील सॉल्वंट रसायनाने भरलेल्या बॅरलने पेट घेतला. परिणामी मोठी आग लागली. या आगीचे मोठे लोळ घेऊ लागल्याने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. 

दरम्यान लोणी काळभोर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. सुरूवातीला पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक थांबवली व पुणे येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या हडपसर, कोंढवा तसेच मुख्य केंद्रातील एक अशा 3 फायरगाड्या घटनास्थळी लगेच दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शिवाजी चव्हाण, तानाजी गायकवाड, कैलास टकले, विशाल दडस, संजय जाधव, चंद्रकांत नवले, सचिन आव्हाळे, संदीप कर्ण, अनिल गायकवाड, राहुल बांदल, अंबादास दराडे, सेंट्रल फायर स्टेशनचे चंद्रकांत वाघ, दत्तात्रय शेटे, सुनिल भरेकर, विजय चव्हाण, सुरज जवळकर या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. या आगीत ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला व ट्रक चालक रामदास धोंडीबा सोनवणे हा किरकोळ भाजुन जखमी झाला.या संदर्भात अपघातग्रस्त ट्रकचे मालक मच्छिंद्र शिळीमकर (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहे.

अपघातस्थळाजवळ  तीन तेल कंपन्या !

या अपघातस्थळापासून दोन किलोमीटर अलीकडे केंद्र सरकारच्या हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडिअन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्या कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेलाच आहेत. हा अपघात या कंपन्याजवळ झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, परंतु यामुळे या कंपन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्यात हे महत्वाचे आहे.