Thu, Jul 18, 2019 17:15होमपेज › Pune › ‘बिटकॉईन’ गुंतवणूकदार ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

‘बिटकॉईन’ गुंतवणूकदार ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:34AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

उद्योजक, व्यापारी, फिल्मस्टार यांच्यासह उच्चशिक्षितांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेल्या ‘डिजीटल, क्रिप्सो करन्सी’ असणार्‍या ‘बिटकॉईन’धारकांची प्राप्तिकर विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे; तसेच काही एक्सेंजवर छापे टाकण्यात आले. यामुळे सध्या  ‘बिटकॉईन’ झपाट्याने घसरत आहे. 14 लाख रुपयांवर गेलेला एक कॉईन सध्या दहा लाख रुपयांपर्यंत घसरला आहे. 

भारतासह इतर देशांत ‘बिटकॉईन’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना दिसत आहे. काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर परतावा मिळत असल्याने यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही देवघेवीचे व्यवहार अथवा विनिमयाचे माध्यम म्हणून भारतात ‘बिटकॉईन’चा वापर अवैध असल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे, तरी देखील दिवसेंदिवस ‘बिटकॉईन’ची ‘क्रेझ’ वाढत आहे. एप्रिल-मे महिन्यात जगातील अनेक देशांना ‘रॅन्समवेअर’ या सायबर हल्ल्याने ग्रासले होते.

भारतामध्येही हा सायबर हल्ला झाला. त्या वेळी मागण्यात आलेली खंडणी ही ‘बिटकॉईन’द्वारे करण्यात आली होती. त्यामुळे अंधरात सुरू असलेल्या ‘बिटकॉईन’चा काळा धंदा उजेडात आला. याबाबत चर्चा झाल्याने शासनाने त्याकडे लक्ष वेधले. ‘बिटकॉईन’च्या माध्यमातून केलेले व्यवहार हे पूर्णपणे गैर असल्याचे शासनाने स्पष्ट केले; तसेच ‘बिटकॉईन’ आणि त्यासाठी पैसे ट्रान्स्फर करून देणार्‍या कंपन्यांची चौकशी करून माहिती मागवली.

पन्नास हजार ते एक लाखादरम्यान खरेदी-विक्री होणार्‍या ‘बिटकॉईन’ने अचानक उसळी घेतली. काही महिन्यांतच लाख, दोन लाख, साडेतीन लाख, चार लाख असे करत अवघ्या सात महिन्यांत तो अकरा लाख रुपयांवर पोचला. त्यानंतर तो एक महिन्यात चौदा लाख रुपयांवर पोचला. यावर शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या समिती नेमल्या. नागरिकांचे म्हणणे मागवले. आरबीआयने हे व्यवहार अवैध असल्याचे घोषित केले, तरी देखील यामध्ये उच्चशिक्षितांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यामध्ये मोठमोठे उद्योजक, फिल्म स्टार, आयटी क्षेत्रात काम करणारे यांनी गुंतवणूक केलेली आहे. 

दरम्यान ‘बिटकॉईन’ वाढतच चालला असताना प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर टिमने देशात ठिक-ठिकाणी छापे टाकले.  ‘बिटकॉईन एक्सेंजर’वर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. त्यानंतर काही प्रमुख बँकांकडून माहिती मागवून यामध्ये कोणी गुंतवणूक केली आहे याचीही माहिती गोळा केलेली आहे. यामुळेच सध्या कॉईनची किंमत घसरताना दिसत आहे.

प्राप्तिकर विभागाने सध्या मोठ्या प्रमाणावर ‘बिटकॉईन’मध्ये गुंतवणूक केलेल्यांची चौकशी सुरू केलेली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून या डिजीटल करन्सीद्वारे गुंतवणूक करणार्‍यांची संख्या मोठी आहे. शहरात काही परिसरात ‘बिटकॉईन’चे व्यवहार करणारे एजंटही आहेत. 

यामुळेच बंगळूरच्या प्राप्तिकर विभागाने शहरात एका ठिकाणी छापा टाकून माहिती गोळा केली होती. याच माहितीच्या आधारे विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणारे आणि उद्योजक यांची सखोल चौकशी होणार असल्याची खात्रीशीर माहिती अधिकार्‍यांनी दिली.