होमपेज › Pune › बिटकॉईन फसवणूक; अद्याप सर्व्हर दूरच

बिटकॉईन फसवणूक; अद्याप सर्व्हर दूरच

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

बिटकॉईनच्या माध्यमातून साखळी पद्धतीने गुंतवणुकीच्या आमिषाने हजारो नागरिकांची फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज या दोघांच्या पोलिस कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ करून त्यांना निगडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. अमित भारद्वाज व विवेक भारद्वाज या दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने त्यांना दिल्ली विमानतळावरून अटक केली होती. त्यांच्याविरोधात पुण्यातील निगडी व दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात एकूण 57 नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत दिल्ली येथूनही तक्रारदारांनी पुणे सायबर सेलशी संपर्क साधला आहे. तपासादरम्यान त्यांनी कंपनीच्या मुख्य सर्व्हरची अद्यापही पोलिसांना माहिती दिली नाही. यामुळे किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे हे अद्यापही निष्पन्न झाले नाही. 

या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असून, या आरोपींनी सुमारे आठ हजार जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी दत्तवाडी आणि सायबर सेलच्या पोलिसांनी बिटकॉइन, ‘इथरियम’ आणि रोख लाख रुपये जप्त केले आहेत; तसेच अटक केल्यानंतर दोघांकडेही 160 बिटकॉइन्स, तीन लाख ‘एमकॅप’, 80 हजार इथरियम असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आजवर आलेल्या 57 तक्रारींमध्ये 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Tags : Pune, Bitcoin, fraud, server,  still, far, away