Thu, Apr 25, 2019 05:30होमपेज › Pune › आभासी चलनाची पुण्यातही मुळे

आभासी चलनाची पुण्यातही मुळे

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:29AMपिंपरी : प्रतिनिधी

सध्या सगळीकडे ‘बिटकॉईन’ या आभासी चलनाची चर्चा त्याच्या दराच्या चढ-उतारावरून सुरू आहे. ‘बिटकॉईन’च्या लाखो रुपयांच्या दरामुळे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये मिळालेला मोठा परतावा यामुळे अनेकांचे लक्ष यासारख्या आभासी चलनाकडे लागले आहे. शेअर मार्केट व इतर ठिकाणी गुंतवणूक करून स्वतःकडील रक्कम झटपट वाढवून घेणारी मंडळी आणि विशेषतः ‘ब्लॅक मनी’ असणारे यामध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. भारतामध्ये झालेली नोटाबंदी आणि त्यानंतरचा सायबर हल्ला यानंतरच यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले. विशेष म्हणजे परदेशात तयार केले जाणारे हे ‘क्रिप्टो करन्सी’ आता भारत, महाराष्ट्रच नव्हे, तर पुणे शहरातही तयार होत आहे. 

केंद्र शासनाने एक वर्षापूर्वी पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या. यानंतर काळा पैसा असणार्‍यांना स्वतःकडील पैसे ‘व्हाईट’ करून घ्यायचा किंवा ते कुठे गुंतवायचे असा विचार पडला. यातच ‘बिटकॉईन’सारखा पर्याय पुढे आला. एजंटांनी ‘टार्गेट’ हेरून यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. एप्रिल-मे महिन्यांत जगातील अनेक देशांना ‘रॅन्समवेअर’ या सायबर हल्ल्याने ग्रासले होते. भारतामध्येही हा सायबर हल्ला झाला. त्या वेळी मागण्यात आलेली खंडणी ही ‘बिटकॉईन’द्वारे देण्यात आली होती. त्यामुळे अंधारात सुरू असलेला ‘बिटकॉईन’चा काळा धंदा उजेडात आला. यावरून अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांसाठी पैशाची देवाण-घेवाण होऊ लागली. 

कॉइन्सचे असंख्य प्रकार

नूल्स, एमडीएस, ईटीपी, स्पान्क, एडीएक्स, मॉड, इन्स, टीएनसी, वाबी, एमएलएन, आग्रस, एक्सबीवाय, सीटीआर, इडीजी, आयोएन, डाटा, इंट, क्यूआरएल, टीएनटी, लून, यूटीके, फ्युल, व्हिया, इडो, डीएमडी, पीआरजी, एसआरएस, एसडब्ल्यूएस, एक्सआरपी, टीआरएक्स, डस, गॅस, झेक, व्हेन, ओएमजी, केएनसी, बाट यांसारखी अनेक ‘कॉईन’ मार्केटमध्ये आहेत. पाच रुपये किमतीपासून ते दहा हजार रुपयांच्या किमतीमध्ये मिळणारी ही सारी कॉईन ऑनलाईन दिसत आहेत. या ‘कॉईन’ची दर मिनिटाला किंमत बदलत आहे. या ‘कॉईन’साठी प्रत्येक ठिकाणी एजंट फोफावले आहेत. ‘बिटकॉईन’मुळे यांसारख्या अनेक ‘कॉईन’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे.

पाच-दहा रुपये एका ‘कॉॅईन’ची किंमत ठेवून ती विक्री केली जात आहेत. यासारखे लाखो, कोट्यवधी कॉईन मार्केटमध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. यातून मिळालेला पैसा इतर व्यवसायात लावून त्यातून बक्कळ पैसा कमावला जात आहे. सुरुवातीच्या काही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात परतावा, फायदा देऊन विश्‍वास संपादन केला जातो. यामुळे अनेक जण यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतात. ‘कॉईन’ तयार करणार्‍यांचे ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यानंतर तो सर्वांना गंडा घालतो आणि कोणालाही पैसे परत देत नाही. अशा प्रकारे अनेक ‘कॉईन’ची स्थिती आहे, तर काही ‘कॉईन’ची स्थिती एकदम चांगली आहे. ग्राहकांना योग्य वेळेत, योग्य मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करण्याकडेही गुंतवणूकदारांचा कल आहे.