Sat, Nov 17, 2018 12:09होमपेज › Pune › निगडीतील बीटकॉईन फसवणूक प्रकरण 

 ४ हजार ८०० पानांचे दोषारोपपत्र दाखल

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

क्रिप्टोकरन्सी असलेले बीटकॉईन घेऊन त्या बदल्यात एमकॅप हे बाजारात मूल्य नसलेले आभासी चलन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या सायबर गुन्हे शाखेने मुख्य आरोपी अमित भारद्वाज याच्यासह सात आरोपींविरोधात चार हजार 800 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. हे दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात बुधवारी सादर केले. या गुन्ह्यात तब्बल 12 कोटींची फसवणूक झाल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. 

सदर गुन्ह्यात  120 जणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यांची एकूण 12 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी अमित भारद्वाज (रा. दिल्ली), विवेक भारद्वाज (रा. दिल्ली), पंकज अदालखा (रा. दिल्ली), हेमंत भोपे, हेमंत सूर्यवंशी, हेमंत चव्हाण (सर्व रा.पुणे) व अजय जाधव (रा.पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अशाचप्रकारे दत्तवाडी पोलीस ठाण्यात  निशा रायसोनी (वय-46,रा.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 21 आरोपींविरोधात चार हजार पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदर गुन्ह्यात एकूण 57 जणांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. 

निगडीच्या या गुन्ह्यात अद्याप दहा आरोपी फरार असून त्यांची नावे दोषारोपत्रासोबत न्यायालयात देण्यात आली आहे. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात व्यावसायिक भीमसेन बाबूराम अगरवाल यांनी फिर्याद दिली आहे. अगरवाल यांना गेनबीटकॉईन कंपनीत बिटकॉईन गुंतविल्यास मोठ्या मोबदल्याची अमिषे दाखवून, त्यांना बिटकॉईन विकत घेण्यास लावून त्यांची एकूण एक कोटी रुपयांच्या 93.5 बिटकॉईनची फसवणूककेली. आरोपींनी संगनमताने कट रचून संबंधित बिटकॉईनची परस्पर विक्री करुन त्याचा ठरल्याप्रमाणे परतावा न देता तसेच गुंतविलेले बिटकॉईन किंवा त्यांची किंमत परत न करता फसवणूक करण्यात आली.