Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Pune › जैवविविधतेची महापालिकेत नोंदच नाही!

जैवविविधतेची महापालिकेत नोंदच नाही!

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:12AMपुणे : अपर्णा बडे

मुळा-मुठा नदीतून सत्तरहून अधिक माशांच्या प्रजाती, पाणवनस्पती, त्याचबरोबर टेकडीवरील जैवविविधतेचे जगभरात कौतूक व्हायचे, त्या पुण्याला प्रदूषणाचा कलंक लागला; तेथे अजूनही सरकारी पातळीवर जैवविविधतेचे महत्व उमगले नसल्याचे दिसून येत आहे. जैवविविधता पार्कचे गोडवे गाणार्‍या महापालिका प्रशासनाकडे एका पुस्तिकेव्यतिरिक्त शहरातील जैवविविधतेसंदर्भातील एका ओळीचेही ‘रेकॉर्ड’ नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बीडीपी, अर्थात जैवविविधता पार्कवरुन खल करणार्‍या राजकीय नेत्यांनाही याचे काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होते आहे. 

‘आयटी सिटी’ म्हणून ओळख मिळविल्यानंतर शहराच्या प्रगतीने वेग घेतला; मात्र त्याबरोबर अनाहूतपणे नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडून इमल्यावर इमले चढले. काँक्रीटचे जंगल फोफावत असताना टेकड्यांचा श्‍वास कोंडला. संस्कृतीरक्षक म्हणून ओळख असणार्‍या पुण्यात नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करण्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष झाले. टेकड्यांवरील प्राणी, पक्षी, किटक नामशेष होऊ लागले. वाढत्या नागरिकरणामुळे शहरात मध्यवर्ती टेकडीवर जिथे बिबट्या, रानमांजर, भेकरांचे दर्शन व्हायचे, तेथे आता वनसंपदाच काय, तर टेकडी म्हणूनही अस्तित्व उरलेले नाही. भकास झालेल्या टेकड्यांमुळे हा नैसर्गिक ठेवा संपुष्टात येत असताना ‘बीडीपी’च्या माध्यमातून आरक्षण ठेऊन, जैवविविधता पुन्हा वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केल्याचे दाखविण्यात आले खरे; पण या आरक्षणावर जैवविविधता वाढविण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे येथेही अतिक्रमण झाल्याचे दिसते आहे. 

महापालिकेकडे नोंदच नाही!

पुण्यात पूर्वी कोणती जैवविविधता होती याची थोडीफार माहिती पर्यावरणासाठी काम करणार्‍या व्यक्ती, संस्थांकडे आहे. मात्र, यासंदर्भातील काहीही माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे नाही. बीडीपी, नदीपात्र स्वच्छता, वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम घेऊन आणि पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करण्यापुरते मर्यादित काम करणार्‍या महापालिकेकडे जैवविविधता वाढविण्यासाठी कोणतेही व्हिजन नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

प्रदूषणाबाबत बेफिकिरी

नागरीकरणामुळे प्रदूषणात वाढ झाली असून,  शहरातील बहुतांश पाणथळ जागा बाधित झाल्या आहेत. जलपर्णीसारख्या वनस्पतीमुळे जलसृष्टी संपुष्टात आली आहे. पत्री, आघाडा, दुर्वा यांसारख्या सहज सापडणार्‍या आणि मूळ अधिवास असलेले तण, तुरळक प्रमाणात दिसतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे वृक्षाच्छादन वेगाने घटते आहे. धूपही वाढली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे प्रदूषकांवर जगणारे पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ होते आहे, तर अधिवास नष्ट झाल्याने अनेक पक्षी शहरातून गायब झाले आहेत. दुर्दैवाने, जैवविविधतेच्या र्‍हासाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य प्रशासनाला नाही.

आदेशाची अंमलबजावणी नाही

विशेष म्हणजे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करावी, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. जैवविविधता वाढविण्यासाठी नोंदवही करावी. महत्त्वाच्या नोंदी ठेवून त्याचा अभ्यास करावा आणि प्रयत्न करावेत, असा या मागचा उद्देश आहे. मात्र, पुणे महापालिकेने याबाबत काहीच केलेले नाही. मागील काही वर्षांमध्ये जैवविविधतेचा व परिसंस्था ढासळण्याचा काय परिणाम झाला, याबाबतची अधिकृत माहिती मिळणे यामुळे अशक्य आहे. विकासामुळे निसर्ग संपत्तीचा र्‍हास झाला आहे की नाही याचा तौलनिक अभ्यास केल्यास पुणे शहराचे पर्यावरणाची स्थिती काय आहे हे समजण्यास मदत होईल.