Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Pune › बिंद्रे प्रकरण : पोलिस आयुक्‍त नगराळेंना सहआरोपी करा 

बिंद्रे प्रकरण : पोलिस आयुक्‍त नगराळेंना सहआरोपी करा 

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:58AM

बुकमार्क करा
बेलापूर : वार्ताहर 

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी नवी मुंबई पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अश्‍विनी बिंद्रे यांचे भाऊ आनंद बिंद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर 2016 रोजी नवी मुंबई पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती. या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच कोणतेही सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही सावध रहा, असे आयुक्‍तांनी त्यावेळी आम्हाला सांगितले.

पोलिसांकडे या प्रकरणात कुरूंदकर आरोपी असलेल्या ऑडिओ, व्हिडीओ उपलब्ध असतानादेखील याप्रकरणी पोलिसांनी कुरूंदकरविरोधी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टोबर 2016 रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली. त्यांनतर सहायक पोलिस आयुक्‍त प्रकाश निलेवाड आणि पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्‍ती केल्यानंतर 31 जानेवारी 2017 रोजी अश्‍विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही 16 नोव्हेंबर 2017  रोजी  प्रसारमाध्यमांच्या समोर आल्यांनतर हा विषय दृष्टिक्षेपात आला. आम्ही ज्यावेळी आयुक्‍तांना पुराव्याचे दाखले देत कुरूंदकर यांना अटक करण्याची मागणी केली, ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी सांगितले. मात्र, याचप्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली, तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे अश्‍विनी बिंद्रे यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांनी सांगितले.

11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत अश्‍विनी बिंद्रे आणि अभय कुरूंदकर हे सोबत होते. यानंतर रात्री 11 वाजता अभय कुरूंदकर याने राजेश पाटीलला फोन केला. तेव्हापासून अश्‍विनी बेपत्ता आहेत आणि त्यांचा फोनदेखील तेव्हापासून बंद होता. यांनतर 14 एप्रिल रोजी केवळ  व्हॉट्स अ‍ॅप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता. त्यानंतर अश्‍विनी  पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत, असे आनंद बिंद्रे यांनी सांगितले. बेपत्ता प्रकरण केवळ प्रसारमाध्यमांमुळे बाहेर आले. प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखविल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, असे यावेळी अश्‍विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.