Wed, Jul 17, 2019 10:55होमपेज › Pune › तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश : साखर आयुक्त

तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश : साखर आयुक्त

Published On: Apr 27 2018 6:48PM | Last Updated: Apr 27 2018 7:01PMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम थकित ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त संभाजी कडु पाटील यांनी तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश दिले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी, सातारा जिल्ह्यातील न्यु फलटण शुगर्स खासगी आणि बीड जिल्ह्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या तीन कारखान्यांनी मिळून शेतकर्‍यांच्या एफआरपीची १५८ कोटी ९७ लाख ५६ हजार  इतकी रक्कम थकित ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८ च्या गाळप हंगामात ३१ मार्चअखेर ३ लाख ९० हजार २९० टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच 15 एप्रिलअखेरच्या देय बाकी अहवालानुसार निव्वळ एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांचे ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये थकित ठेवलेले आहेत. 

फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर्स या खासगी कारखान्याने हंगाम २०१७-१८ मध्ये २ लाख ८३ हजार ४५७ टन उसाचे गाळप केले. 15 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार शेतकर्‍यांच्या उसाचे 47 कोटी 86 लाख 98 हजार रुपये थकित ठेवले आहेत. गेवराई तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ मध्ये ३ लाख ६३ हजार ५३१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 15 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार ५६ कोटी ६५ लाख ८ हजार रुपये इतकी एफआरपीची रक्कम थकित आहे. 

याबाबत साखर आयुक्तालयाकडून तीनही कारखान्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या होत्या. यावेळी कारखान्यांकडून थकबाकी भरण्याचे कबुल करुन लेखी हमी देण्यात आली होती. ही रक्कम भरण्याची संधी देवूनही कारखान्यांनी थकित एफआरपी रकमेचा भरणा केलेला नाही. 

त्यामुळे थकित एफआरपी रकमेवर विहीत दराने देय होणारे व्याज या रक्कमा कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीद्वारे विक्री करुन या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकीची रक्कम शेतकर्‍यांना देण्यासाठी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करुन अहवाल साखर आयुक्तालयास सादर करावा, असेही साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
 

Tags : pune, pune news, Bima Patas, New Phaltan Sugar Factory, jaibhavani sugar factory, seizure,