Wed, Nov 14, 2018 19:51



होमपेज › Pune › पालिकेची सल्लागारांवर कोट्यवधीची  उधळपट्टी

पालिकेची सल्लागारांवर कोट्यवधीची  उधळपट्टी

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 27 2018 10:24PM



पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध  छोट्या  मोठ्या विकासकामांसाठी खासगी सल्लागार नेमले जात आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह स्मशानभूमीचे कामासाठीही सल्लागार नियुक्त करण्याचा ‘धंदा’ पालिका प्रशासन राबवित आहे. त्यामुळे आयुक्तांनाही खासगी सल्लागार नेमावा, असा उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. 

सन 2017-18 ते आतापर्यंत कोणकोणत्या कामासाठी खासगी सल्लागार नेमले गेले. त्यावर किती खर्च करण्यात आला आणि त्या अनुषंगाने सविस्तर माहिती साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गेल्या महिन्यात 26 तारखेस मागितली होती. मात्र, महिना उलटत आला तरी, अद्याप ही माहिती दिली गेली नाही. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रशासनाच्या या कृतीवर त्यांनी संताप व्यक्‍त केला. 

साने म्हणाले की, पालिकेत  असंख्य अभियंते आहेत. त्यांना भरमसाट वेतन दिले जाते. त्यांच्याकडून विविध विकासकामांचे काम करवून घेण्यापेक्षा सरसकट सर्वच कामांसाठी खासगी सल्लागार नेमण्याचा प्रशासनाने सपाटा लावला आहे. त्यामुळे पालिकेचे अभियंते त्या कामासाठी लायक नसल्याचे चित्र झाले आहे. पिंपळे गुरव परिसरात रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक लावण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्तीस मागील स्थायी समितीने मान्यता दिली होती. समितीच्या बुधवारी (दि. 25) झालेल्या सभेत चर्‍होली येथील स्मशानभूमीसाठी खासगी सल्लागार नियुक्तीस मंजुरी दिली गेली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात केवळ महत्त्वाच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमले जात होते. पुणे-मुंबई जुना महामार्गावरील ग्रेडसेपरेटर, रावेतचा बॉस्केट ब्रिज, नाशिक फाटा दुमजली उड्डाणपूल, मदर तेरेसा उड्डाणपूल, शिवसृष्टी, अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह, घरकुल योजना आदी मोठ्या कामांसाठी सल्लागार नेमले होते. मात्र, सत्ताधारी भाजप ऊठसूट खासगी सल्लागार नेमून पालिकेच्या पैशांची अनाठाई उधळपट्टी करीत आहे. स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत 5 ते 10 सल्लागार नेमण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांना कमी करून त्यांच्या जागी खासगी सल्लागार नेमण्याचा उपरोधिक सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला आहे.