Mon, Mar 25, 2019 02:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ

दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:25AMपुणे  :  अक्षय फाटक 

वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनांमुळे त्रस्त असणार्‍या पुणेकरांवर दुचाकी चोरट्यांपासून सावध राहण्याची नवी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण सध्या दुचाकीवर आलेले चोरटे महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पर्स पळवत आहेत.  चोरट्याचे धाडस ऐवढे वाढले आहे की ते  सध्या धावत्या रिक्षातील महिलांची मंगळसुत्रे, पर्सवर डल्ला मारत आहेत. गेल्या आठवड्यात अशा दोन घटना घडल्या आहेत; तर गेल्या चार महिन्यात बॅग लिफ्टींग, रस्त्यात अडवून लुटणे, हत्याराच्या धाक आणि जबरदस्तीने लुटीच्या घटनातही वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत आहे. 

शहरातील वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आलेले पुणेकर वेळेत पोहचण्यासाठी चिंचोळ्या रस्त्यातून वाकडी-तिकडी वाट काढतात.  बेशिस्त वाहन चालक आणि वाहन संख्येच्या विस्फोटामुळे  त्यांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे.  अचानक कधी कुठे काही दुर्घटना घडल्यास वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. अनेक अडचणीचे डोंगर पार करत वाहन चालवत असणारे  पुणेकर वाहनधारक दुचाकीस्वार चोरट्यामुळे त्रस्त झाल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.  कधी सुसाट दुचाकीवर कोण येईल अन् गळ्यातील साखळी किंवा वाहनाला अडवून जबरदस्तीने मौल्यवान वस्तू लुटून नेईन याचा नेम राहिलेला नाही. कारण सुसाट दुचाकीवर येऊन चोरटे शहरातील नागरिकांच्या महागड्या वस्तूवर डल्ला मारत आहेत. 

घराबाहेर शतपावली करणार्‍या नागरिकांचे दुचाकीस्वार चोरटे सहज मोबाईल पळवतात. तर कधी रस्त्यावरून पायी जाणार्‍यांना लुटतात. दुचाकीवरून प्रवास करणार्‍या नागरिकांनाही चोरटे लक्ष्य बनवत आहेत.  हळून त्यांच्यावर दुचाकी नेऊन मोबाईल, मंगळसुत्र हिसकावून पसार होतात.  कहर म्हणजे चाकूसारख्या हत्यारांचा दाख दाखवूनही मोबाईल, रोकड अन् दागिने दुचाकीस्वार चोरटे लंपास करत आहेत. सध्या या  या चोरट्यांनी रिक्षातून प्रवास करणार्‍यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. धावत्या रिक्षासोबत दुचाकी चालवून चोरटे अलगदपणे महिलांच्या पर्स आणि मंगळसूत्रावर डल्ला मारत आहेत.  गेल्या आठ दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. तर, अडवून लुटणे, जबरदस्तीने लुटणे, हत्याचाराचा धाक दाखवून लुटणे यासारख्या गंभीर घटनांही वाढल्या आहेत.  त्यामुळे शहरात पोलिसींग नावालाच उरले की काय ? असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.